निवडणुका संपल्या, दीपावलीची खरेदी सुरू झाली आणि बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू झाला असल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून ऐकू येऊ लागली आहे. पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटावरील पांढऱ्या जागेत उजेडात दिसणारे महात्मा गांधीचे चित्र दिसत नसल्याची तक्रार व्यापारी करू लागले आहेत. गर्दीच्या वेळी प्रत्येक नोट तपासता येत नसल्याने काही जण फसविले जात आहेत.विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांकडून या नोटा येत असल्याचे एका व्यापाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

विधानसभा निवडणुकांमध्ये अर्थ व्यवहाराची चर्चा सुरूच होती. बीड येथे तर नोटांसह काही कार्यकर्ते पकडलेही गेले. अनेक ठिकाणी रक्कम पकडल्याचे वृत्त होते. मात्र, ग्रामीण भागातून होणाऱ्या या व्यवहाराला बनावट नोटांचा संदर्भ जोडला जात आहे. औरंगाबाद शहरातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्याने काही नोटा काढून ठेवल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत बनावट नोटा वाढल्या असल्याचेही बँक कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे. दोनशे आणि पाचशे रुपयांची हुबेहूब नोट बनवून त्या बाजारपेठेत आणल्या जात असल्या तरी त्याची तक्रार मात्र केली जात नाही. अनेक व्यापाऱ्यांनी बनावट नोटा आल्यानंतर त्या व्यवहारातून काढून टाकण्यावर भर दिला आहे.