विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय मैदानात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, निकालात बाजी मारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सर्वस्व पणाला लावल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रचारसभांचा धडाका सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, अशी खंत व्यक्त केली. या मुद्यावर तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी मौन सोडले आहे.

“शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली,” असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. “बाळासाहेबांच्या अटकेविषयी आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असे का करताय, तेव्हा ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत.” असं अजित पवार यांनी नेत्याच्या नावाचा उल्लेख टाळत सांगितलं होतं. मात्र, बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा छगन भुजबळ हे गृहमंत्री होते.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं. त्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. “अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेऊन सांगावे. विभागाच्या प्रमुखांची ती चूक होती, असे ते सांगत आहेत. पण शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नाही,” असं ठाकरे म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेबांना झालेल्या अटकेवरून सुरू झालेल्या राजकीय वादावर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “१९९९मध्ये प्रचार सुरू केला, तेव्हा आमच्या वचननाम्यात श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असं म्हटलेलं होतं. त्यानंतर १९९५ मध्ये युतीचं सरकार आलं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरूद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. नंतर ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. पण हा मुद्दा आता संपला आहे.”असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.