माजी आमदार घोडमारे यांचा लवकरच पक्षप्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा

नागपूर : राष्ट्रवादीचा गढ असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून रोज एक  नेता पक्ष सोडून भाजपमध्ये जात असताना राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्य़ात भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे हिंगण्याचे माजी आमदार विजय घोडमारे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनी मंगळवारी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे नेते व माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहे. या दोन्ही पक्षाचे विदर्भातील काही नेते भाजप-सेनेच्या संपर्कात आहेत. मात्र अद्याप बडा मासा भाजपच्या गळाला लागलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात धडक देत भाजपमधील नाराजांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे हे त्यापैकीच एक आहेत. खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यात्रेसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. मंगळवारी सकाळी विजय घोडमारे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजप-शिवसेनेमध्ये जात असताना  मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्य़ात मात्र भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

घोडमारे २००९ ते २०१४ या काळात हिंगण्याचे आमदार होते. २०१४ मध्ये विद्यमान आमदार असतानाही त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली व त्यांच्या ऐवजी दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांना उमेदवारी दिली. मेघे विजयी झाले. पाच वर्षांत मेघे-घोडमारे यांच्यात राजकीय वाद निर्माण झाले. त्यामुळे घोडमारे नाराज होते. मधल्या काळात त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावेळीच ते राष्ट्रवादीत जाणार असे संकेत प्राप्त झाले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन भाजप सोडण्यावर शिक्कामोर्तब केले.

आमदार होण्यापूर्वी  घोडमारे जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ सदस्य होते. त्यांना भाजपने प्रथम हिंगण्यातून राष्ट्रवादीचे रमेश बंग यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली व त्यांचा निसटत्या मतांनी विजय झाला होता. घोडमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला तर तो भाजपसाठी धक्का मानला जाईल. यासंदर्भात घोडमारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बातमीला राष्ट्रवादीतून दुजोरा मिळाला आहे.

‘‘विजय घोडमारे तीन वर्षांपासून पक्षात सक्रिय नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर विनाशकाले विपरीत बुद्धी असेच म्हणावे लागेल. ’’

– डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप