सत्तास्थापनेबाबत पुढे जाण्यासाठी उद्धव ठाकरेंशी आज काँग्रेस नेत्यांची सदिच्छा भेट झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे राज्यातील नेते या बैठकीला उपस्थित होते. त्यांनतर थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.

थोरात म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काल राज्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी एकत्रित निवेदनही काढले. त्यानुसार, किमान सामाईक कार्यक्रमावर आधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा होईल त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा केली जाणार आहे.

आणखी वाचा- शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

कालच्या दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज आमची उद्धव ठाकरे यांच्याशी सदिच्छा भेट आणि चर्चा झाली. एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी अशा प्रकारे सदिच्छा भेट करणे गरजेचे असते. आम्ही भेटतोय हीच सरकार स्थापन करण्याबाबत सकारात्मक बाब आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेळेत चांगला निर्णय घेऊ, असे थोरात यावेळी म्हणाले.