सीमेवर पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर भाजपाला त्याचा लाभ मिळाला म्हणूनच भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली. तसंच पुन्हा पुलवामासारखं काही घडलं नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असंही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ” पुलवामा येथील दहशतवादी हल्ला घडला की घडवला गेला? याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती, मात्र देशाचा विषय असल्याने यावर काही बोलू नका असे मी त्यांना सांगितले ” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातही बदल नक्की घडेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान मराठवाड्यात पूर्ण फिरलो, शेतकरी आणि तरुणांमध्ये पूर्ण उत्साह आहे. बैठका बोलावल्या होत्या त्याच्या जाहीर सभा झाल्या. साध्या निरोपावरही कोणतंही मोठं नियोजन न करता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. नाशिक येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांना आता शेजारचा देश आवडू लागला आहे असं मोदी म्हणाले होते. दरम्यान मोदी यांच्या या भाषणाचाही समाचार शरद पवार यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्थिक मंदीबाबत काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीही घडले नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.