प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी कर्जत—जामखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही पैशाचा आखाडा करुन ठेवला आहे. जातीयवादाला बळ दिले जात आहे. एकमेकांची उणी दुणी काढली जात आहेत. प्रश्नांचा विसर पडला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण जाधव यांच्या कर्जत येथील प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते. या वेळी सोमनाथ भैलुमे, नंदकुमार गाडे,  मच्छिंद्र सुपेकर, कांतीलाल कोकाटे, उमा जाधव, सुरेखा जाधव, द्वारका पवार, सुरेखा सदाफुले, नितीन कांबळे, हनुमंत साळवे, रंगीशा काळे, बी. डी.चव्हाण, सुनील शिंदे, अशोक सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.

माजी खासदार आंबेडकर पुढे म्हणाले,की कर्जत—जामखेड विधानसभा मतदार संघातील दोन्ही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने डॉ.अरुण जाधव या भटक्या विमुक्त समाजातील उच्च शिक्षित उमेदवाराला संधी दिली आहे. तिसरा पर्याय म्हणून त्यांना निवडून द्या आणि जातीयवाद करणाऱ्या दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना धडा शिकवा. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची पर्वा नाही. मराठा व धनगर असा जातीयवाद सुरु आहे. त्याविरुद्ध तिसरा पर्याय आम्ही दिला. कुटुंबशाही वाढू द्यायची नाही. लोकशाहीचे सक्षमीकरण करायचे, म्हणून आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची सरकारे काही करु शकलेली नाही. वंचित  बहुजन आघाडीच विकासाचा कायापालट करील, असे ते म्हणाले.

डॉ.अरुण जाधव म्हणाले,की विरोधी दोन्ही उमेदवाराकडून मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्ही लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढवित आहेत. पंचवीस वर्ष भाजपाचा आमदार आहे, पण विकास झाला नाही. दोन्ही उमेदवार सत्तेसाठी लढत आहेत. सामान्य माणसाशी त्यांना घेणे देणे नाही. या मतदार संघात तिरंगी लढत आहे.  प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी  भगवान राऊत यांनी स्वागत, नंदकुमार गाडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सोमनाथ भैलुमे यांनी आभार मानले. या वेळी  बापू ओहोळ, विशाल पवार, विकास म्हस्के, अरुण डोळस, संतोष गर्जे, सचिन भिंगारदिवे, वैजीनाथ केसकर, सागर भांगरे, तुकाराम पवार, काजोरी पवार, दिगंबर पवार, महेश आखाडे आदि उपस्थित होते.