पुणे

वेध विधानसभेचा

dharashiv, vanchit,
धाराशिव : वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती, कोणाला होणार लाभ, कोणाची गुल होणार बत्ती?
Ramtek Lok Sabha, Ramtek, mahayuti Ramtek,
मतदारसंघाचा आढावा : रामटेक; नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर
bacchu kadu, Ramtek,
बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’

बाळासाहेब जवळकर / प्रथमेश गोडबोले, पुणे</strong>

एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भाजप-शिवसेनेत युती होणार की नाही, यावर जिल्ह्य़ातील अनेक मतदारसंघांतील लढतीचे स्वरूप ठरणार आहे. युती न झाल्यास बहुतांश ठिकाणी भाजप-शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढती होऊ शकतील. जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था मात्र फारच बिकट आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांवर आता भाजपचा प्रभाव आहे. पिंपरी पालिकाही भाजपच्याच ताब्यात आहे. चिंचवडमधून भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला चिंचवडमधून ९६ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास त्यांना आव्हान देण्याइतपत ताकदही राष्ट्रवादी वा काँग्रेसमध्ये नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

भोसरीतही भाजपचा आमदार आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय होत नव्हते, तेव्हा त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडण्याची ग्वाही शिवसेनेने दिली होती. भोसरीत ४१ हजारांचे मताधिक्य शिवसेनेला मिळाले. आता बदलत्या परिस्थितीत शिवसेनेने घूमजाव केले असून भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे.

पिंपरी मतदारसंघात (राखीव) शिवसेनेचा आमदार आहे. येथे शिवसेनेपेक्षा भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी मतदारसंघ रिपाइंला सोडण्याची आग्रही भूमिका घेतली असल्याने तीनही पक्षांत पिंपरी मतदारसंघावरून वादंग होण्याची शक्यता आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा झेंडा आहे. मावळात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय असूनही गटबाजीमुळे त्या पक्षाला यश मिळालेले नाही. विद्यमान आमदार, राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांनीच आव्हान उभे केले आहे. उमेदवारी मिळो न मिळो, निवडणूक लढवण्याचा शेळके यांचा निर्धार आहे. भाजपच्या घडामोडींवर राष्ट्रवादीचे लक्ष आहे.

आंबेगाव मतदारसंघातून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. १९९० पासून ते सहा वेळा निवडून आले आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव आंबेगावातून विधानसभा निवडणूक लढणार का, याविषयी मतदारसंघात उत्सुकता आहे. तूर्त वळसे पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम उमेदवाराचा शोध शिवसेना घेत आहे.

माळी-मराठा असे जातीय समीकरण असलेला खेड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. दहा वर्षे आमदार राहिलेल्या दिलीप मोहिते यांचा पराभव करून शिवसेनेचे सुरेश गोरे येथून निवडून आले होते. यंदा मोहिते यांनी गोरे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.

जुन्नर विधानसभेतून मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे निवडून आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सोनवणे यांना शिवसेनेकडून उमेदवारीचे वचन मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या आशा बुचके यांना यंदा दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.

शिरूर विधानसभेत मतदारांनी राष्ट्रवादीचे अशोक पवार आणि भाजपचे बाबुराव पाचर्णे यांना आलटूनपालटून संधी दिली आहे. यंदा पाचर्णे पुन्हा दावेदार असून त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पै. मंगलदास बांदल हे नव्या दमाचे कार्यकर्ते शिरूरच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहेत.

इंदापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी मंत्री, काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील गेल्या २० वर्षांपासून करत आहेत. अनेक वर्षे ते मंत्री होते. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाकडे तो मतदारसंघ असे आघाडीतील जागावाटपाचे सूत्र असल्याने पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाटील आणि भारणे यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

दौंड मतदारसंघात रासपचे राहुल कुल विद्यमान आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांना मोठे पद देण्याचे आश्वासन दिले. त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. तसेच पवार घराण्याचे निष्ठावंत माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव चर्चेत आहे.

भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोपटे यांच्यापुढे शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी आव्हान उभे केले होते. यंदाही थोपटे आणि कोंडे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.

पुरंदर मतदारसंघात राज्यमंत्री आणि शिवसेनानेते विजय शिवतारे विद्यमान आमदार आहेत. नियोजित विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्प, पालखी महामार्ग, सासवड येथील प्रशासकीय कार्यालय ही कामे अर्धवट असल्याने शिवतारे यांच्यासमोर आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत येथून काँग्रेसचे संजय जगताप केवळ आठ हजार मतांनी पराभूत झाले होते. यंदाही शिवतारे-जगताप लढतीची शक्यता आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील दुष्काळ, निरा डाव्या कालव्याचा पाणी प्रश्न आणि धनगर आरक्षण या मुद्दय़ांवरच यंदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट आहे. अजित पवार यांच्या विरोधात यंदा मराठा समाजातीलच उमेदवार देण्याची भाजपची खेळी असेल.

* चिंचवड – भाजप

* भोसरी – भाजप

* मावळ – भाजप

* पिंपरी – शिवसेना

* खेड आळंदी – शिवसेना

* जुन्नर – शिवसेना

* शिरूर – भाजप

* आंबेगाव – राष्ट्रवादी

* दौंड – रासप

* इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस</p>

* बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस

* पुरंदर – शिवसेना

* भोर – काँग्रेस

भाजप-शिवसेनेची युती आणि संभाव्य जागावाटपाचा निर्णय युतीच्या वरिष्ठ पातळीवर होईल. पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीच्या सर्व जागा निवडून आणू, याची खात्री आहे.

– लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष आणि आमदार