कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून मांडलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी सामानामध्ये छापून आलेल्या अग्रलेखामध्ये भाजपावर टीका तर राष्ट्रवादीवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर रोहित यांनी एका खासगी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ‘सामना’तील भूमिकेचे कौतूक केले आहे.

‘ही शिवरायांचीच प्रेरणा! उतू नका मातू नका…’ या मथळ्याखाली सामनामध्ये शुक्रवारी छापण्यात आलेल्या अग्रलेखामधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. उतू नका मातू नका नाहीतर माती होईल , असा जनादेश देणारा निकाल ‘ईव्हीएम  मधून बाहेर आला आहे’ असं म्हटलं होतं. याच अग्रलेखात भाजपावर टीका करण्यात आली होती तर राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या निवडणुकीतील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. यावरच आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘मागील काही महिन्यांपासून ‘सामना’च्या माध्यमातून चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं जातं असल्याचा आनंद आहे’ असं म्हटलं आहे.

“एक चांगली गोष्ट सामनाच्या माध्यामातून मागील काही महिन्यांपासून दिसत आहे ती म्हणजे ते चांगल्या गोष्टीला चांगलच म्हणतात आणि वाईट गोष्टीला ते वाईटच म्हणतात. त्यांनी केलेल्या कौतुकाचं आम्ही स्वागतच करतो. भाजपाला मागील चार वर्षात ते सातत्याने चुकीचंच म्हणतं होते. भाजपा निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे, युवकांच्या हिताने आणि लोकांच्या हिताचे निर्णय भाजपा घेत नाही याबद्दल सामनामधून सातत्याने बोलणं झाल्याचं पहायला मिळालं,” असं रोहित म्हणाले. तसेच अग्रलेखाच्या माध्यमातून काही नवीन समिकरणांचे संकेत मिळत आहेत का यासंदर्भातही रोहित यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल असं मत व्यक्त केलं आहे. “सामनामधून सातत्याने भाजपावर टीका होऊनही लोकसभेला ते (शिवसेना-भाजपा) एकत्रित आले, पुन्हा विधानसभेला ते एकत्रित आले. याचं थोडसं आश्चर्य वाटलं. आता ते सामनाच्या माध्यमातून काय बोलतात, त्यातून काय संकेत देतात हे मला सांगता येणार नाही. शेवटी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आमच्याकडून शरद पवार आणि काँग्रेसचे मंडळी आणि इतर जे नेते असतील तो जे निर्णय घेतील तो आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्यच असेल,” असं रोहित म्हणाले.

रोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निटकटवर्तीय राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभव केला. रोहित हे ४३ हजार ३४७ मतांनी निवडून आले. संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले होते. विजय मिळवल्यानंतर रोहित यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील स्मृती स्थळाला भेट दिली.

सामनाच्या अग्रलेखात पवारांचे कौतुक

“मोठ्या विजयाचे स्वप्न भंग पावले; पण सत्ता राखता आली इतकेच काय ते समाधान. शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही पुन्हा कस लागला. एका जिद्दीने ते लढले . मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून घोषित केले; पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते ‘तेल’ थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी ‘गदा’ जिंकली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक केलं.