रत्नागिरी : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या   मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून केवळ तीन उमेदवार असलेल्या चिपळूण मतदारसंघाचा निकाल सर्वांत आधी लागेल, असा अंदाज आहे.

दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण  ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी चिपळूणमध्ये सर्वात कमी तीन, तर दापोली मतदारसंघात सर्वांत जास्त, अकरा उमेदवार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक मतमोजणी केंद्रावर  १४ ते १५ टेबल लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलला एक सुपरवायजर, मायक्रो ऑब्झरवर व अन्य २ कर्मचारी असे ४ कर्मचारी नियुक्त केले आहेत. या निवडणुकीत प्रथमच जादा केंद्रीय मायRो ऑब्झरवर असणार आहेत. सर्व ठिकाणी सकाळी आठ वाजता पोस्टल मतांनी मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे प्रत्यक्ष नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी होणार आहे . उमेदवार आणि झालेले मतदान लक्षात घेता, मतमोजणीच्या एकूण सुमारे २४ ते २५ फेऱ्या होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र चिपळूण मतदारसंघात कमी उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निकाल लवकर लागणार आहे. मतमोजणीबरोबरच प्रत्येक मतदारसंघातील ५ केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनवरील नोंदणीचीही तपासणी होणार असल्याने एकूण प्रक्रियेला थोडा उशीर होणार आहे.

पाच मतदारसंघांपैकी राजापूर, रत्नगिरी आणि चिपळूण येथील शिवसेनेचे विद्य्मान आमदार अनुक्रमे राजन साळवी, उदय सामंत आणि सदानंद चव्हाण यांच्यापुढे आपापल्या जागा राखण्याचे आव्हान आहे. त्यापैकी साळवी आणि सामंत यांना फार प्रयास पडणार नाहीत; पण चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांच्याशी चव्हाण यांची निकराची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर सेनेमध्ये आलेले गुहागरचे विद्य्मान आमदार भास्कर जाधव यांनाही निवडणूक फार जड गेली नसावी, असा अंदाज आहे. मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश यांना दापोली मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्य्मान आमदार संजय कदम यांच्याशी झुंजावे लागेल, असा होरा आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे या प्रत्येक जागेचा निकाल सेनेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.