भाजपासोबत तडजोड करावी यासाठी आपण शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती केंद्रीय मंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. तसंच आपण संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्यूला सांगितला असून तो त्यांना मान्य असल्याचा खुलासाही आठवले यांनी केला आहे. आपण यासंदर्भात भाजपाशी चर्चा करणार असल्याचं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरुन शिवसेना-भाजपामध्ये फिस्कटलं आणि सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. याच मुद्द्यावरुन रामदास आठवले यांनी आपण संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की, “तडजोड करण्यासंबंधी मी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना तीन वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री आणि दोन वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हा फॉर्म्यूला सांगितला. यावरुन त्यांनी भाजपा हा फॉर्म्यूला मान्य करण्यास तयार असेल तर आपण विचार करु शकतो असं सांगितलं. मी भाजपाशी यासंबंधी चर्चा करणार आहे”.

दरम्यान याआधी रामदास आठवले यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा असं म्हटलं होतं. “महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा एकच मुख्यमंत्री हवा ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचाही पाठिंबा आहे,” असं त्यावेळी आठवले यांनी सांगितलं होतं.

युतीला पुन्हा सत्ता मिळाली तर मंत्री पदांमध्ये निम्मा निम्मा वाटा आणि अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद अशी मागणी शिवसेनेने केली होती. निवडणुकीपूर्वी शाह आणि फडणवीस यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव यांचे आरोप फेटाळले होते. आपण उद्धव यांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची चर्चा झाली असेल, आपल्याला माहीत नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव यांच्या आरोपांचे ओझे शाह यांच्या खांद्यावर टाकले होते. त्याबाबत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिले.