राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या आघाडीसाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपानं एकत्र यावं यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेकला आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजपानं एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, या मागणीसाठी आज संभाजी भिडे हे पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. तर समस्त हिंदू आघाडीच्यावतीनं मिलिंद एकबोटे यांनीदेखील पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्रिपदावरून तसंच काही महत्त्वाच्या खात्यांवरून शिवसेना भाजपामध्ये संघर्ष पेटला होता. त्यानंतर संभाजी भिडे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. परंतु उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पाठिंब्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लवकर सरकार स्थापन होण्याच्या शक्यता धुसरच वाटत आहेत. आता सर्वांच लक्ष आज (बुधवारी) पार पडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे लागलं आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संभाजी भिडे हे काय भूमिका मांडतायत हे पहावं लागणार आहे.