शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भाजपने दिले नव्हते असं स्पष्टीकरण भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी दिले. त्यानंतर आज मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. इतकचं नाही त्यांनी शिवसेनेनेही वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं असंही म्हटलं आहे. मोदींनी फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही या शाह यांनी विचारलेल्या प्रश्नाचेही राऊत यांनी उत्तर दिले आहे.
आणखी वाचा- ‘अमित शाह मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत’; राऊतांचा आरोप
“महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, युतीचा विजय झाला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,” असं वक्तव्य काल महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलताना शाह यांनी व्यक्त केलं होतं. या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. “भाजपानेच नाही तर शिवसेनेनेही निवडणुकांआधी वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी अमित शाह यांनी आक्षेप व्यक्त केला नाही,” असं राऊत म्हणाले. तसेच मोदींनी फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला तेव्हा ते पंतप्रधान असल्याने आम्ही शांत बसलो असंही राऊत म्हणाले. “मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळेच त्यांनी जेव्हा फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं तेव्हा आम्ही आक्षेप घेतला नाही. मोदी आणि ठाकरे कुटुंबाचे मागील अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मोदींबद्दल देशातील प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला आणि नेत्याला जितके प्रेम वाटते तितकेच आम्हालाही वाटते. आम्हालाही मोदी प्रिय आहेत. त्यामुळेच जेव्हा त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल वक्तव्य केले तेव्हा आम्ही ते खोडून काढले नाही. आम्ही त्यांचा आदर करतो,” असं राऊत म्हणाले.
शाह यांच्यावर आरोप
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. “मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे,” असं राऊत म्हणाले.