महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही. जी आघाडी झाली आहे ती सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ टिकणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत.  भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र महाराष्ट्रात आत्ता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे अशीही टीका गडकरींनी केली आहे.

 

Union Minister Nitin Gadkari on Maharashtra govt formation: This(Shiv Sena-NCP-Congresss) is an alliance of opportunism, they will not be able to give Maharashtra a stable Government https://t.co/NMeH7S0GN8 pic.twitter.com/58ZHrqshk5

— ANI (@ANI) November 22, 2019

नेमकं काय म्हणाले गडकरी
” या पक्षांमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने कायमच कडाडून विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेने विरोध केला आहे हे आपण जाणतोच. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारधाराही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारे ही महाविकास आघाडी झालेली नाही. ही फक्त संधी साधू आघाडी आहे. त्यामुळेच ही महाविकास आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगलं नाही.”

“भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांची युती ही सिद्धांताच्या आणि विचारांच्या आधारावर झालेली होती. हिंदुत्त्वाचा विचार त्यामागे होता. त्यामुळे दीर्घकाळ चाललेली युती म्हणूनच सेना भाजपाच्या युतीकडे पाहिलं गेलं आहे. आजही आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. युती तुटली आहे हे मराठी माणसाचं नुकसान आहे” असंही गडकरींनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं.