सत्तास्थापनेचा पेच सुटल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद घेणं बंद केलं असलं तरी ट्विटरच्या माध्यमातून शेर पोस्ट करण्याची मालिका मात्र सुरुच ठेवली आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे. “हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं” हा शेर संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.

शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सात मंत्र्यांच्या या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे केंद्रीय व इतर राज्यांतील नेते, तमिळनाडूच्या द्रमुक पक्षाचे एम. के. स्टॅलिन आदी नेत्यांनी हजेरी लावत देशात बिगरभाजप प्रादेशिक-राष्ट्रीय पक्षांची एकजूट शक्य असल्याचा राजकीय संदेश दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शपथविधीस हजर होते.

शिवसेनेची स्थापना आणि प्रसार ज्या शिवाजी पार्कवरून झाला त्याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. या शपथविधीमध्ये मराठवाडा वगळता सर्व भागांतील मंत्र्यांना संधी मिळाली. महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून पावणेसात वाजता शपथ घेतली तेव्हा सारे शिवाजी पार्क ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्यासाठी आलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला साष्टांग नमस्कार केला. उद्धव यांनी आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांना शपथ देत विधिमंडळ गटनेत्यास, तर सुभाष देसाई यांच्या रूपाने ठाकरे घराण्याच्या विश्वासू व्यक्तीस संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचे व मराठा समाजातील नेते जयंत पाटील यांच्यासोबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संधी देत सामाजिक समतोल साधला, तर काँग्रेसने दोन निष्ठावंतांची निवड करताना थोरात यांच्या रूपाने मराठा समाजाला, तर विदर्भातील नितीन राऊत यांच्या रूपाने दलित समाजातील नेत्याला संधी देत संदेश दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र-जय शिवराय अशी घोषणा देत शिवसेनेतील आपल्या इतिहासाला उजाळा देताना गांभीर्यपूर्वक शपथ घेताना महात्मा जोतिबा फुले, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केले. शरद पवार यांचा उल्लेखही त्यांनी केला, तर नितीन राऊत यांनी तथागत गौतम बुद्ध यांना साक्षी ठेवून शपथ घेतली.