आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती कायम असणार की नाही, हे जरी अद्याप जाहीर झालेले नसले तरी देखील दोन्ही पक्षांकडून रोज उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. रविवारी एमआयएमकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आज (मंगळवार) वंचित बहुजन आघाडीने तब्बल २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर आजही आमचे नेते आहे असं म्हणत एमआयएम वंचित बरोबर युती करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी वंचितचे दरवाजे एमआयएमसाठी शेवटच्या क्षणापर्यंत खुले असल्याचे आंबेडकर म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर जलील म्हणाले की, युतीसाठी वंचितचे दरवाजे उघडे असतील तर आमचा संपुर्ण गेट खुला आहे. एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर होत असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांच्या या विधानाने वंचित- एमआयएम आघाडी बाबत संभ्रम आणखी वाढला आहे.


एमआयएमकडून रविवारी पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन, सोलापूर मध्यमधून फारूख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख व सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या अगोदरही एमआयएमकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण सात जागांवरील उमेदवार एमआयएमकडून निश्चित करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीनेच ही यादी जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे.