पुण्यातील २५ टक्के मतदान केंद्रे बदलली

सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील तब्बल ७२८ मतदान केंद्रे (२५ टक्के) बदलली आहेत. लोकसभेला मतदान केलेल्या ७२८ मतदान केंद्रांचा पत्ता यंदा बदलला आहे. परिणामी, पुणेकरांनी मतदानाआधीच आपले मतदान केंद्र माहिती करून घेणे आवश्यक ठरणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व केंद्रे तळमजल्यावर आणल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, मतदान केंद्र हलवल्यामुळे अनेक केंद्र दोन किलोमीटरपेक्षा दूर गेली आहेत.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार ८०१ मतदान केंद्रे आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित केली आहेत. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

त्याची अंमलबजावणी यंदा विधानसभेसाठी करण्यात आली. मात्र, यापूर्वी आणि चालू वर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जी ७२८ मतदान केंद्रे होती ती तळमजल्यावर आणताना त्याच ठिकाणची किंवा त्याच इमारतीतील जागा प्रशासनाला उपलब्ध झाली नाही. परिणामी, या ठिकाणांवरून जवळच्या ठिकाणी तळमजल्यावर ही केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ही प्रक्रिया करत असताना मतदान केंद्रे संबंधित मतदारांच्या घरापासून दोन कि. मी. अंतरापेक्षा जवळ असण्याचा नियम पाळण्यात आलेला नाही. असाच प्रकार पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही झाला आहे.

दरम्यान, अनेक मतदारांना घरापासून दूरची मतदान केंद्रे देण्यात आल्याबाबत मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी हरकती आणि सूचनांसाठी आवाहन करण्यात आले होते. या कालावधीत संबंधित नागरिक किंवा राजकीय पक्षांनी हरकती नोंदवल्या नाहीत.

शहरासह जिल्ह्य़ात एक हजार १८७ मतदान केंद्रात बदल

शहरातील आठ मतदारसंघांपैकी वडगाव शेरी मतदारसंघातील १७५, शिवाजीनगरमधील १८, कोथरूडमधील १४१, खडकवासलामधील १४०, पर्वतीमधील ९१, हडपसरमधील १३६ आणि कसबा पेठ मतदारसंघातील २७ अशी एकूण ७२८ मतदान केंद्रे बदलली आहेत. पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघांपैकी चिंचवडमधील १७५, पिंपरीमधील १४५ आणि भोसरीमधील ४१ अशी एकूण ३६१ मतदान केंद्रे बदलली आहेत, तर ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांपैकी आंबेगाव मतदारसंघातील दोन, खेड-आळंदीमधील दहा, दौंडमधील दोन, इंदापुरातील तीन, बारामतीमधील आठ, पुरंदमधील ३३, भोरमधील २७, मावळातील तीन अशी शहरासह जिल्ह्य़ातील एकूण एक हजार १८७ मतदान केंद्रे बदलली आहेत.

मतदान केंद्र कसे शोधाल

  •  केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवर मतदारांच्या नावासह मतदान केंद्राची माहिती मिळते.
  •   मतदारांना १९५० या  हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती मिळू शकेल.
  • मतदार मदत केंद्राच्या ०२०-२६१२१२३१-५९-६३-६४-६७-६८-६९-७१-७२-७३-७४-७५-७९-८१ आणि ९१ या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

शहरातील मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या

वडगाव शेरी – ४१७, शिवाजीनगर – २८०, कोथरूड – ३७०, पर्वती – ३४४, खडकवासला – ४३१, हडपसर – ४०६, पुणे कॅन्टोन्मेंट – २७४ आणि कसबा पेठ – २७९. एकूण दोन हजार ८०१