मोहन अटाळकर

आघाडीचे गतवैभव राखण्याचे प्रयत्न:– जिल्ह्यातील आठ मतदार संघांपैकी अनेक ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र असले, तरी भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मुख्य लढत आहे. महायुतीला अस्तित्व कायम राखण्याची संधी असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसताना त्यांच्या वाटय़ाला तीन जागा आल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये पसरलेली नाराजी, एक-दोन ठिकाणी झालेली बंडखोरी, ‘अ‍ॅन्टी इन्कबन्सी’चा सामना प्रस्थापितांना करावा लागत असून नव्या उमेदवारांनी यावेळी लढतीत रंगत आणली आहे.

अमरावतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असून जिल्ह्याच्या राजकारणातील दोन दिग्गज या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. मतांच्या ध्रुवीकरणाच्या आधारे भाजपचे डॉ. सुनील देशमुख आणि काँग्रेसच्या सुलभा खोडके यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

बडनेरातील थेट लढत रंजक वळणावर पोहचली असून अपक्ष रवि राणा आणि शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्यातील मुकाबल्यात जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतविभाजनातून रवि राणा यांना विजयाची संधी मिळाली होती, मात्र यावेळी त्यांच्यासमोर थेट लढतीचे खरे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना बडनेरातून मताधिक्य मिळू शकले नव्हते, ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यात थेट लढत आहे. भुयार हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांना उभय पक्षांकडून किती मदत मिळते, यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

धामणगाव रेल्वेत काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, भाजपचे प्रताप अडसड आणि वंचित आघाडीचे नीलेश विश्वकर्मा यांच्यात तिहेरी लढत असून काँग्रेसचे बंडखोर प्रवीण घुईखेडकर, अपक्ष अभिजीत ढेपे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत वेगळेच रंग भरले आहेत.

तिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत आहे. राजेश वानखडे प्रथमत:च निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. काँग्रेसचा हा पारंपरिक गढ टिकवून ठेवण्याचे कौशल्य यशोमती ठाकूर यांना दाखवावे लागणार आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दर्यापुरात भाजपचे रमेश बुंदिले, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि भाजपच्या बंडखोर सीमा सावळे यांच्यात तिहेरी लढत असताना रिपाइंचे संतोष कोल्हे, वंचित आघाडीच्या रेखा वाकपांजर यांच्या मतांकडेही अनेकांचे लक्ष राहणार आहे. अनुसूचित जातीव्यतिरिक्त मतांची विभागणी किंवा एकजूट या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे.

मेळघाटमध्ये भाजपचे रमेश मावस्कर, राष्ट्रवादीचे केवलराम काळे आणि प्रहारचे राजकुमार पटेल यांच्यात तिरंगी मुकाबला आहे. ही लढत तूल्यबळ मानली जात आहे. रमेश मावस्कर नवखे आहेत. राजकुमार पटेल यांच्यासाठी नवा झेंडा हाती घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्याचे आणि केवलराम काळे यांच्यासमोर जुन्या लोकांना एकत्रित करण्याचे आव्हान आहे.