लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : एप्रिलपर्यंत डॉलरचा दर शंभर रूपयापर्यंत जाण्याची भीती असून यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे. तरीही विरोधक मौन पाळून गप्प आहेत अशी टीका बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेल्यापासून डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरू आहे. आजच्या घडील एक डॉलरसाठी 88 रूपये मोजावे लागत आहेत. पुढील महिन्यापर्यंत डॉलरसाठी शंभर रूपये मोजावे लागतील. यामुळे रशिया वगळता अन्य देशातून इंधन तेल आयातीवर अधिक रक्कम मोजावी लागणार असून इंधन दरवाढीचा धोका आहे. इंधन दरवाढ होताच त्याचा परिणाम बाजारातील अन्य वस्तूंची महागाई वाढण्यावर होतो. मोदींना ट्रम्प शासनाने भारतात जो आयातकर आकारला जाईल तोच कर अमेरिकेत आकारला जाईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेकडून मिळणार्‍या व्यापार सवलती बंद होण्याच्या शक्यतेने शेअर बाजार कोसळत आहे. सामान्य माणसाची क्रयशक्ती कमी झाल्याने बाजारात चलन फिरत नाही. यामुळे जीएसटी संकलनातही घट झाली असून याचा परिणाम विकास कामावर होणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आले असताना विरोधक मात्र मौन पाळून गप्प आहेत. अदानीचे काय होईल ते व्यवस्था पाहून घेईल, सामान्य माणसाशी याचा संबंध नाही. मात्र, याचा बागुलबुवा उभा केला जातो आहे. वायूदलात आधुनिक यंत्रणा उपलब्ध होत नाही यामुळे चीनबरोबर युध्द झाले तर आपण जिंकू शकणार नाही असे प्रमुख सांगत आहेत. राफेल खरेदी करार मनमोहन सिंग सरकारच्या काळात करण्यात आला. मोदी सरकारने सत्ता हाती घेताच हा करार रद्द करून अदानीकडून याचा पुरवठा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.आधुनिक यंत्रणा वायूदलाला हवी आहे, मात्र, केंद्र शासन याकडे गांभीर्याने पाहण्यास राजी नाही अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभ मेळाची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिग चाललेले आहे त्याचा निषेध आहे. कुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एक हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, मात्र, सरकार ३८ मृत झाल्याचे सांगत संख्या लपवत आहे. हिंदू संघटनांनी मृतांच्या पार्थिवावर अंत्यविधी कसे केले हे सांगावे असे आवाहन करून अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोचवत आहे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वत।ला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा असेही ते म्हणाले.