राज्यातील ८ कोटी मतदारांपैकी मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या तब्बल १ कोटी ४३ लाख ४१ हजार मतदारांची नावे मतदारयादीतून बाद होणार आहेत. रितसर नोटीस व पंचनामा करून ही कारवाई करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानेच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. छायाचित्रे जमा करण्याच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या केंद्रस्तरीय तसेच प्रभागस्तरीय अधिकाऱ्यांच्या विरोधात सौम्य धोरण न ठेवता कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही राज्याला देण्यात आल्या आहेत.
मतदारांच्या छायाचित्रासहीत मतदारयादी तयार करण्याबाबत देशात इतर राज्ये आघाडीवर असताना महाराष्ट्राचे काम मात्र पिछाडीवर पडले आहे. देशातील केरळ, तमीळनाडू या राज्यांनी हे काम १०० टक्के पूर्ण केले असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व अन्य राज्यांनीही ९७ ते ९८ टक्के काम पूर्ण केले आहे. महाराष्ट्राचे काम मात्र फक्त ८५ ते ८८ टक्क्य़ांच्या दरम्यान रेंगाळत आहे. तब्बल १ कोटी ४३ लाख ४१ हजार मतदारांची मतदार यादीत नोंद आहे, मात्र त्यांची छायाचित्रे नाहीत. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्यंतरी दिल्लीत राज्यातील उपजिल्हाधिकारी स्तरावरच्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात त्यांना या कामाला गती देण्याचा आदेश दिला.
महाराष्ट्रात ठाणे या सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या जिल्ह्य़ात तब्बल ३० लाख ४३ हजार ४९० मतदारांची मतदार यादीत नावे आहेत, मात्र छायाचित्रे नाहीत. अन्य जिल्ह्य़ांची आकडेवारी याप्रमाणे-मुंबई उपनगर- २१ लाख ९१ हजार ११६, मुंबई शहर- ६ लाख ७६ हजार ८२३, पुणे-१५ लाख ८० हजार १७०, नाशिक- ५ लाख ६७ हजार २७९, जळगाव- ३ लाख ८५ हजार ७९८, सोलापूर- ५ लाख ७५ हजार ८५८, सांगली- २ लाख ४७ हजार ८५८. राज्यातील अन्य जिल्ह्य़ांचीही आकडेवारी याचप्रमाणे लाखाच्या पुढेच आहे. १५ मार्च २०१३ पासून राज्याने छायाचित्रे नसलेल्या मतदारांची छायाचित्रे जमा करण्याची मोहीम सुरू केली, मात्र त्याला थंडा प्रतिसाद मिळाल्याने छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या संख्येत फार लक्षणीय फरक पडलेला नाही. जून २०१३ पर्यंत छायाचित्र मतदारयादीचे काम केंद्रीय निवडणूक आयोगाला देशात पूर्ण करायचे आहे. अन्य राज्ये त्याबाबतीत आघाडीवर असताना महाराष्ट्र मात्र पिछाडीवर पडल्याने आयोगाने महाराष्ट्राच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० कलम २२ सी अनुसार एखादा मतदार ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत त्याच्या पत्त्यावर राहात नाही असे निवडणूक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला आढळल्यास त्याचे नाव मतदार यादीतून रद्द करता येते. वारंवार कळवूनही ज्याअर्थी मतदार त्याचे छायाचित्र देत नाही, त्याअर्थी त्याचा रहिवास तिथे नाही असे समजून रितसर नोटीस बजवावी व पंचनामा वगेरे कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याचे नाव यादीतून रद्द करावे असे आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
नगर जिल्हा आघाडीवर
देशात महाराष्ट्र पिछाडीवर असला, तरीही महाराष्ट्रात नगर जिल्हा या कामात चांगलाच आघाडीवर आहे. अन्य जिल्ह्य़ांची कामे ७५ ते ८० टक्क्य़ांवर रेंगाळलेली असताना नगर जिल्ह्य़ाचे काम मात्र तब्बल ९४ टक्के झाले आहे. एकूण ३० लाख ८८ हजार ६९६ मतदारांपैकी फक्त २ लाख ३० हजार ६२६ मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत. नाशिक विभागात सर्वाधिक काम नगर जिल्ह्य़ाचे झाले असून मतदारसंख्येच्याही तुलनेत राज्यात नगर जिल्हा पहिल्याच क्रमांकावर आहे.