एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश

अलिबाग : इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या शुक्रवारी २२ वर पोहोचली. दिवसभरात सहा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. मात्र, दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही १०५ जण बेपत्ताच असून, त्यांच्या शोधाची आशा मावळली आहे.  खालापूरमधील इरशाळगडाच्या पायथ्याशी वसलेली इरशाळवाडी बुधवारी मध्यरात्री दरड कोसळून काळाच्या उदरात गडप झाली.

या दुर्घटनेनंतर गुरुवारी दिवसभर शोधकार्य राबविल्यानंतर सायंकाळी थांबवलेले बचावकार्य शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता सुरू करण्यात आले. ‘एनडीआरएफ’, ‘टीडीआरएफ’, स्थानिक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, सिडको आणि अँडलॅब इमॅजिकाचे कामगार असे एकूण ९०० जण या बचावकार्यात सहभागी झाले होते. सकाळच्या सत्रात दाट धुके आणि नंतर मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. शुक्रवारीही यांत्रिक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे फावडे, कुदळ यांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्यात येत होता. विस्तीर्ण परिसर आणि माती भुसभुशीत असल्याने शोधमोहीम राबवताना बचाव पथकांना कसरत करावी लागत होती. मात्र, बचाव पथकांनी नेटाने शोधमोहीम राबवत सहा मृतदेह बाहेर काढले. संध्याकाळी मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे ही मोहीम थांबविण्यात आली असून, शनिवारी सकाळी ती पुन्हा सुरू करण्यात येईल.

दुर्घटनेनंतर गुरुवारी, पहिल्या दिवशी १६ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी बाहेर काढलेल्या सहा मृतदेहांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे या दर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे. अद्यापही १०५ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान बचाव पथकांपुढे आहे. इरशाळवाडीत साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून फवारणी केली जात आहे. तसेच गावात तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन : शिंदे

मुंबई : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. इरशाळवाडी दुर्घटनेबाबत मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. रायगड जिल्ह्यात आणखी आठ गावे दरडप्रवण क्षेत्रात असून, तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

इरशाळवाडी दुर्घटनेत १०५ जण अद्यापही बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेतील आठ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ६७ जणांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. -योगश म्हसे, जिल्हाधिकारी