महाराष्ट्र शासनाच्या आपत्तीव्यवस्थापन मंत्रालयाच्या दिमतीला पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या 116 बचाव कार्य करणाऱ्या बोटी उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा इतर मागास ओबीसी कल्याण मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.

पावसाळ्यापूर्वी राज्याच्या मान्सून पूर्वतयारीची बैठक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक आज झाली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, संबंधित सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपापल्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवला. या बैठकीला सर्व विभागीय आयुक्त, मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच थल सेना, वायू सेना, नौ-सेना आदी सर्व दलाचे राज्यातील प्रमुख सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मान्सून पूर्व तयारी करताना, कोरोना सोबतही याच काळात आपण लढणार आहोत. हे लक्षात ठेवून कार्यरत व्हावे, अशी सूचना केली.

यावेळी प्रास्ताविक करताना वडेट्टीवार यांनी यावर्षी मान्सून पूर्व तयारी करतांना, राष्ट्रीय सायक्लोन रिस्क रिडक्शन प्रोजेक्ट अंतर्गत 230 कोटी रुपयांचे अलिबाग, रत्नागिरी आदी ठिकाणी भूमिगत विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. याशिवाय आपत्तीव्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या अन्य कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सोबतच हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना कळावा. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत हवामानासंदर्भात नीटनेटका संदेश पोहचावा यासाठी रेडिओ यंत्रणा उभारण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, मान्सूनच्या आगमनापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था विभागाने केल्या आहेत. ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाय योजना केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये सर्व विभागीय आयुक्त व विभाग प्रमुख यांनी आपापल्या विभागात सुरू असलेल्या मान्सून पूर्वतयारीची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या बैठकीचा समारोप केला.