हर्षद कशाळकर,लोकसत्ता,

अलिबाग- एसटी महामंडळाने सुरु केलेल्या महिला सन्मान योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. दीड महिन्यात जवळपास १५ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिलांना सरसकट प्रवास तिकीटात ५० टक्के सवलत दिल्याने महिला प्रवाश्यांची संख्या चांगलीच वाढली आहे.

राज्य सरकारने एसटी मधून सर्व महिला प्रवाश्यांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. महिला सन्मान योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. या सवलती मुळे एसटीचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यसरकार एसटी महामंडळाला दरमहिन्याला फरकाची रक्कम देणार आहे.

हेही वाचा >>> “घरात बसलेल्यांमध्ये दम आहे का? आमच्या कामांमुळे त्यांचा…,” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एसटी महामंडळाच्या या योजनेला महिलांनी उंदड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. एसटी मधील महिला प्रवाश्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. जिल्‍हयाचा विचार केला तर रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरूड,, माणगाव, महाड , श्रीवर्धन असे आठ आगार आहेत. यात दीड महिन्यात या आगारातून १५ लाख २८ हजार ६१६ महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही संख्‍या पूर्वीच्‍या तुलनेत जवळपास ५० टक्‍क्‍यांनी अधिक असल्‍याचे एसटी च्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एसटीकडून मिळालेल्‍या आकडेवारीवर नजर टाकली तर जिल्‍हयात सर्वाधिक महिला प्रवासी (३ लाख १८ हजार ७९०)  पेण आगाराला मिळाल्‍या आहेत. त्‍याखालोखाल अलिबाग आगारातील बसेसमधून ३ लाख ११ हजार ३९० महिलांनी प्रवास केला आहे.सर्वात कमी महिला प्रवासी (७९ हजार ११९) मुरूड आगाराला मिळाले आहेत. यामुळे पूर्वी रिकाम्‍या फिरणाऱ्या अनेक फेऱ्यांना प्रवासी मिळू लागल्‍याचे चित्र आहे.

आगार     महीला प्रवासी               उत्पन्न 

महाड   १ लाख ३५ हजार ०२३          ३९ लाख ११ हजार ४३८

अलिबाग ३ लाख ११ हजार ३९०         ६९ लाख ७४ हजार ३१२

पेण     ३ लाख १८ हजार ७९०          ३४ लाख १७ हजार ७३९

श्रीवर्धन  १ लाख ४० हजार १४३         ३८ लाख ११ हजार ८२०

कर्जत    २ लाख २७ हजार ४३०        ३३ लाख ११ हजार ४०४

रोहा     २ लाख ४ हजार ०४७         ४४ लाख ७५ हजार ४५८

मुरुड     ७९ हजार ११९              २१ लाख २१ हजार ९२९

माणगाव  १ लाख १२ हजार ६७४       २२ लाख ८५ हजार ४४६

जिल्‍हयातील सर्वच आगारांतील गेल्या एस टी बसेसमध्‍ये महिला प्रवाशांच्‍या संख्‍येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५८.५१ लाख अधिक उत्पन्न वाढले आहे.

–  दीपक घोडे, विभाग नियंत्रक -एसटी, रायगड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण महिलांना मोठा लाभ

या एसटी सवलतीचा लाभा विशेषतः ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना झाला आहे. दररोज कामानिमित्‍त शहरात येणाऱ्या महिलांना सहा आसनी रिक्षा, काळी पिवळी किंवा टमटमसारख्‍या प्रवासी सेवांचा पर्याय स्वीकारावा लागत होता. मात्र त्यांच्याकडून जादा दर आकारले जात होते. आता एसटीच्या योजनेमुळे मुळे किफायतशीर दरात प्रवास करणे या महिलांना शक्य झाले आहेत.