नांदेड : ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्याला जबर तडाखा बसला. वीज पडून, पुरात वाहून व अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील १५ व्यक्तींचा मृत्यू झाला. तर विविध प्रकारची २१५ जनावरे दगावली. १ हजार ४९९ घरांची पडझड झाली. ४ हजार ४६३ कुटुंबांतील १५ हजार १५ व्यक्तिंना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. तर ५ लाख ८ हजार ४२५ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जुलै अखेरपर्यंत आणि नंतर ऑगस्टच्या १३ तारखेपर्यंत जिल्ह्यात काही भागांत अतिवृष्टी झाली, तरीही परिस्थिती, पीकस्थिती नियंत्रणात होती. परंतु, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस नंतर दोन दिवस चालला. यांत विविध महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यातील बऱ्हाळी येथे विक्रमी असा ३५५ मि.मी. पाऊस अवघ्या २४ तासांत झाला. याशिवाय १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे मुखेड तालुक्यात गंभीर परिस्थिती उद्भवली. लेंडी नदीच्या घळभरणीचे काम वादग्रस्त ठरले. यात पाच जणांचा जीव गेला.

त्यानंतर जेमतेम ८ दिवसांनंतर पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले. ९३ पैकी ६९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. याचा फटका माहूर वगळता सर्व १५ तालुक्यांना बसला. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून किनवट तालुक्यात एक जण ठार झाला. पुरात वाहिल्याने विविध ठिकाणी १२ जणांचा तर अन्य कारणाने दोन अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १० जणांना प्रत्येकी ४ लाख या प्रमाणे ४० लाख रुपयांची मदत देण्यात आली. उर्वरित प्रकरणात कारवाई सुरू आहे.

दुधाळ, ओढकाम, करणाडी व लहान वासरे अशी एकूण २१५ जनावरे दगावली असून, पैकी २५ प्रकरणांत ८ लाख २४ हजार रुपयांचे वाटप झाले. अन्य प्रकरणांत कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील १६६ अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरमालकांना प्रत्येकी ६५००, अंशतः पडझड झालेल्या कच्चा घरमालकांना प्रत्येकी ४ हजार तर झोपडी मालकांना प्रत्येकी ३ हजार या प्रमाणे एकूण १४९९ प्रकरणांपैकी ११ प्रकरणांत ४४ हजार रुपयांचे प्रत्यक्ष वाटप झाले. उर्वरित प्रकरणांसाठी निधी प्राप्त असून, वाटप सुरू असल्याचे कळविण्यात आले.

याशिवाय तात्पुरते निराधार व स्थलांतरित झालेल्या ४ हजार ४६३ कुटुंबांतील १७ हजार १५ सदस्यांना सुद्धा मदत देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ५३२ गावांतील ६ लाख ५३ हजार ९६५ शेतकरी यांना जोरदार पाऊस व अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला. यामुळे ५ लाख ६ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू शेती, १४०६ हेक्टरवरील बागायत १९३ हेक्टरवरील फळबागा असे एकूण ५ लाख ८ हजार ४२५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची टक्केवारी ६५.८० टक्के एवढी भरते. दरम्यान, ४ लाख १५ हजार ६२४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ४ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.