परभणी : गोरगरीब व सामान्यांसाठी आलेले सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदळाचा साठा करून त्याची काळय़ा बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. दिवसभरात वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी झालेल्या कारवाईत १८५ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे.

शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीसह पूर्णा, जिंतूर व गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया झाल्या. यात पोलीस पथकांनी २ लाख ७५ हजार ७८१ रुपयांच्या तांदळासह ५ लाख ५० हजारांची दोन वाहने असा एकूण आठ लाख २५ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण ८ आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वस्त धान्य दुकानाच्या तांदळाची अवैध रीत्या खरेदी-विक्री करण्याचे उद्देशाने गोदामात साठवलेल्या तांदूळ साठय़ावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई केली. तुकाराम मुंडे यांच्या पवन ट्रेडिंग या आडत दुकानात केलेल्या या कारवाईत रेशनचा ३० पोते तांदूळ जप्त करण्यात आला. एकूण १६ हजार ७३१ रुपयांचा १२ क्विंटल ८ किलो तांदूळ पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल जिंतूर ते साखरतळा मार्गावर जिंतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोडलगतच्या शकील बेग खलील बेग यांच्या शेतातील टीन शेडमध्ये साठा करून ठेवलेला २३७ पोते तांदूळ पोलिसांनी जप्त केला. हा एकूण १ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीचा ११२ क्विंटल ८० किलो तांदूळ आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद साजिद सय्यद गफूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ४४ हजार ८५० रुपयांचा ५१ पोते तांदूळ जप्त केला आहे. याचबरोबर आरोपीकडून तीन लाखांचे चार चाकी वाहन असा एकूण ३ लाख ४४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात नवा मोंढा भागात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६० पोते तांदूळ जप्त करण्यात आला. यात पोलिसांनी एकूण ४५ हजार रुपयांचा ३० क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. मालाची वाहतूक करण्यात येणारे २ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली.