तालुक्यातील गोवर्धन येथील गोदावरी नदीपात्रात धुणे धुतल्यानंतर अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुली पाण्यात वाहून गेल्या. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यातील पोलीस व महसूल खात्यातील पथके रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेत होते.
राणी जगन मोरे (वय ९) ही गोवर्धन येथे राहणारी मुलगी आहे. आशा पोपट गोरे (वय १५, रा. बेलगाव, ता. वैजापूर) ही तिची नातेवाईक काही दिवसांपूर्वी गोवर्धन येथे आली होती. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघीही नदीपात्रावर धुणे धुण्यासाठी दोघी गेल्या. धुणे धुऊन झाल्यानंतर नदीपात्रात अंघोळीसाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने राणी पाण्यात वाहून जाऊ लागली. आशा हिने तिला वाचवण्यासाठी हात दिला, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहात दोघीही वाहून गेल्या.
या मुलींचा आवाज ऐकून दोघे शेतकरी धावत आले, परंतु पाण्याचा वेग अधिक असल्याने त्यांनी वाचवण्याऐवजी नातेवाइकांना बोलावले. दूपर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र हाती काहीही आले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार किशोर कदम, तालुका पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे घटनास्थळी दाखल झाले. दोन बोटी, पट्टीचे पोहणारे व श्रीरामपूर पोलिसांची दोन व वैजापूर पोलिसांचे एक पथक नदीपात्रात मुलींचा शोध घेत आहेत.