रायगड जिल्ह्य़ात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. रोहा तालुक्यातील डोंगरी गावात गावकीने विविध कारणांसाठी २१ कुटुंबांना वाळीत टाकले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे नोंदवली आहे.
प्रसारमाध्यमांनी रायगड जिल्ह्य़ातील सामाजिक बहिष्कार प्रकरणांचा मुद्दा उचलून धरल्यानंतर, जिल्हा प्रशासनाकडील तक्रारींचा ओघ वाढला आहे. पीडित कुटुंबांनी गावकीच्या दहशतीला झुगारून तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला गावातील तीन कुटुंबांना हनुमान पालखीच्या वेळी झालेल्या वादातून वाळीत टाकण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत गणेश कृष्णा मढवी यांचा पराभव झाल्याचे कारण देत आठ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आले. वाळीत कुटुंबाला वहिवाटीचा रस्ता दिला म्हणून यशवंत झावरे यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले. तर सीताराम लखमा पाटील व त्यांच्या दोन भावांच्या कुटुंबाला माहितीच्या अधिकारात खारभूमी आणि वनविभागात अर्ज केला म्हणून त्यांनाही बहिष्कृत केले गेले. तर वाळीत टाकण्यात आलेल्या व्यक्तीला मदत केली म्हणून यशवंत देवजी भगत यांना तर वाळीत टाकलेल्या कुटुंबाच्या घरात निराधार असल्याने राहिले म्हणून सत्यवान मढवी यांनाही बहिष्कृत करण्यात आले आहे.
वाळीत कुटुंबांना गावच्या मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. किराणा मालाच्या दुकानातून सामान देण्यासही मनाई करण्यात आली आहे. नातेवाईकांना भेटण्याची आणि बोलण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लग्न समारंभ अथवा मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. या पीडित कुटुंबांनी सांगितले. ही बाब लक्षात घेऊन, वाळीत प्रकरणी गावकीचे पंचप्रमुख गणेश कृष्णा मढवी आणि इतर २७ जणांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.     पीडित कुटुंबांनी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. यानंतर ५ जानेवारी पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत गावात बठकही घेण्यात आली. मात्र, यानंतरही पीडित कुटुंबावरील बहिष्कार गावकीने मागे घेतला नाही.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 families faces social boycott in raigad
First published on: 10-01-2015 at 03:14 IST