अलिबाग :  रायगड जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. २४ जून रोजी २४ तासांमध्ये ३१७ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. शिवाय जिल्ह्यातील एकूण संख्या हजारांच्या वर गेल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हयात मागील काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाली मात्र सुरुवातीला ही संख्या खूपच कमी होती, आता मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे. आजच्या घडीला एकूण १ हजार ९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले १३ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

  वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क व सजग राहण्याचे तसेच स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत:ची व इतरांची काळजी घावी तसेच कोविड-ॅ१९ नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

नागरिकांनी करोनापासून आपला बचाव करण्यासाठी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यायचे आहेत व इतर नागरिकांनी म्हणजेच १८ वर्षे व त्यावरील नागरिकांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचे २ डोस पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

   तसेच ६० वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असल्यास व त्यांना ३ महिन्यांमध्ये कोविड संसर्ग झालेला नसल्यास त्यांनी प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस पूर्ण करून घ्यावा. त्याचबरोबर १८ ते ५९ वर्षांतील नागरिकांनी प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस  घ्यायचा असल्यास व दुसरा डोस घेऊन ९ महिने झाले असल्यास त्यांनी खासगी लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांचे डोस पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 317 new corona patients numbers steady growth ysh
First published on: 26-06-2022 at 00:02 IST