धवल कुलकर्णी
करोनाचा कहर देशात आणि महाराष्ट्रात सुरु आहे. लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे याप्रकरणी आत्तापर्यंत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २८ जणांचा शोध सुरु आहे. अशी माहिती बलसिंग राजपूत पोलीस अधीक्षक (सायबर विभाग) यांनी दिलं आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशात हेट स्पीच, अफवा पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत.
चोवीस तासांमध्ये खोट्या बातम्या, अफवा आणि विद्वेशपूर्ण गोष्टी म्हणजेच हेट स्पीच चा प्रसार सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या लोकांच्या विरोधात २० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची संख्या १३२ आहे आणि यापैकी ४९ या हेट स्पीच बाबत आहेत, अशी माहिती राजपूत यांनी दिली.
चोवीस तासात दाखल करण्यात आलेल्या या वीस तक्रारींपैकी १४ तक्रारी या धर्माच्या आधारावर विद्वेष पसरवणारी माहिती पसरवण्याबाबत आहेत. तर उर्वरित सहा तक्रारी अफवा पसरवण्याबाबत आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी बीड जिल्ह्यातील आहेत. तर नऊ तक्रारी कोल्हापूरमधल्या आहेत. तर पाच तक्रारी जालना येथील आहेत. बुलढाण्यात दोन तक्रारी आहेत. तर नाशिक, अमरावती, उस्मानाबाद आणि हिगोंली या ठिकाणी प्रत्येकी १ तक्रार दाखल आहे.