सांगली : महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सांगली, मिरज व कुपवाड शहरात ३८३९ फेरीवाले निदर्शनास आले असून, त्यांच्यासाठी प्रभागनिहाय जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी फेरीवाला समितीच्या बैठकीत सांगितले.
शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी आज फेरीवाला समितीची बैठक महापालिकेच्या स्थायी सभागृहात आयुक्त गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी फेरीवाला समितीचे आठ सदस्य व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, वारंवार अपघात होत आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. आयुक्त गांधी यांनी सांगितले, की फेरीवाले समिती व प्रशासन यांच्या चर्चेतून शहरात हातगाडीवाल्यासाठी विभाग निश्चित करण्यात येतील. रहदारीस पदपथ खुले ठेवण्यात येतील. फेरीवाल्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन आणि स्वच्छतेला प्राधान्य देत व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सर्व फेरीवाले रस्त्यावर बसत आहेत, त्यामुळे रहदारीबाबत प्रश्न उपस्थित होऊ नये याकरिता फेरीवाले समितीच्या माध्यमातून फेरीवाले यांचे खुल्या जागेत किंवा प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे. सहायक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला यांनी फेरीवाल्यांसाठी निश्चित होऊ शकणाऱ्या ठिकाणाबाबत माहिती दिली.
विक्रेत्यांसाठी जी ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत, त्याची माहिती अगोदर देऊन प्रशासन व समिती सदस्य यांनी संयुक्त पाहणी करून या जागा निश्चित कराव्यात, अशी सूचना फेरीवाले समिती सदस्यांनी केली.