कर्जत: सीना नदीवरील बंधाऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मलठण येथील शेतकऱ्यांची ४ एकर सुपीक जमीन ५० फूट खोलीपर्यंत खरडून वाहून गेली. ऊस, कांदा, तूर अशी हिरवीगार पिके पाण्यात गडप झाली. लाखो रुपयांचे नुकसान होऊन कुटुंब उद्ध्वस्त झाले. मलठण येथील शेतकरी विजय मुकुंद वाळुंजकर, पोपट वाळुंजकर, राजेंद्र वाळुंजकर, भरत वाळुंजकर, लताबाई वाळुंजकर, धनंजय, दीपक, किरण व ज्ञानेश्वर वाळुंजकर या कुटुंबांनी हंबरडा फोडत पत्रकारांकडे ही तक्रार केली.
आमचे आयुष्यच या पुराने वाहून नेले. नदीकाठी असलेल्या जमिनीवर बंधारा उभारण्यात आला होता. परंतु नियमाप्रमाणे दारे उघडे ठेवायचे असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती बंद ठेवली. सप्टेंबरअखेरपर्यंत दारे उघडी ठेवण्याचा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस पूर आला, बंधारा फुटला आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे या कुटुंबीयांनी सांगितले.
आम्ही आमच्या डोळ्यांनी सुपीक जमीन वाहून जाताना पाहिली, पिके गडप होत होती. पाण्याच्या गर्जनेत आमची वर्षभराची मेहनत, आमचे भविष्यच वाहून गेले, असे सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. घटनेस चार दिवस उलटून गेले, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री तालुक्यात फेरफटका मारून गेले; परंतु आमच्याकडे पाहायला कोणी मलठणला आले नाही. आम्हाला न्याय देणार कोण, असे म्हणत महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला.
आमचे प्रपंच उद्ध्वस्त झाले, मुलाबाळांना काय खाऊ घालायचे, हातात काहीच उरले नाही. आम्हाला तातडीने नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी वाळुंजकर कुटुंबाने केली आहे.
जलसंपदा विभाग जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अखत्यारीत आहे. मंत्री विखे कर्जत तालुक्यात पाहणी करण्यासाठी आले; मात्र मलठणकडे फिरकलेच नाहीत, अशी या वाळुंजकर कुटुंबीयांची तक्रार आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे कोणती भूमिका घेतात, याकडे मलठणमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनीही कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र तेही मलठणकडे फिरकलेच नाहीत, असेही या शेतकऱ्यांनी सांगितले. शेतजमीनच खरवडून गेल्याने शेती करायची कशी, असा यक्षप्रश्न वाळुंजकर कुटुंबीयांपुढे उभा राहिला आहे.