लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभेसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ४१ उमेदवारी अर्ज दाखल केले. तर माढा लोकसभेसाठी एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

शुक्रवारी अखेरच्या दिवशी माढ्यातून २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात शिवसेना उध्दव ठकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह शेकापचे ॲड. सचिन देशमुख यांनी बंडखोरी करून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपचे खासदर रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्यात विलक्षण चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत होणार आहे. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी पूरक अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर यांनीही उमेदवारी आर्ज भरला आहे. शुक्रवारी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी २२उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

आणखी वाचा-मोदी कंपनीला घालवण्याची सुरुवात सांगलीतून – खा. राऊत

तर सोलापूर राखीव लोकसभेसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवशी १९ उमेदवारांनी अर्ज भरले. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे आमदार राम सातपुते या दोन्ही तरूण आणि तगड्या उमेदवारांची चुरशीची लढत अपेक्षित असून त्यांच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे प्रमुख तिसरे उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण ४१ उमेदवार उतरले आहेत. उद्या शनिवारी अर्जांची छाननी होणार आहे. २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ७ मे रोजी मतदान होणार आहे.