दोन दिवसांत एकही नवा बाधित रुग्ण आढळून न येणे आणि तब्बल साडे चारशे रुग्णांची नकारात्मक चाचणी येणे तसेच करोनामुक्त झाल्याने सात रुग्णांना सुट्टी मिळणे अशा आशादायी घटनांमुळे मालेगावकर काहीसे सुखावले असतानांच मंगळवारी प्राप्त झालेल्या १५० पैकी ४८ अहवाल सकारात्मक आढळून आल्याने प्रशासन हादरले आहे. त्यात तब्बल ४४ नवे करोना बाधित रुग्ण असल्याचे उघड झाले.
सोमवारपर्यंत शहरात १२७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आता त्यात वाढ होऊन ही संख्या १७१ वर पोहोचली असून करोनामुळे आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे काही दिवस शहरातील रुग्णालयांमध्ये सुरु असलेल्या उपचारांमुळे बाधित रुग्ण करोना मुक्त होण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दोन दिवसांत करोनामुक्त झालेल्या सात जणांना घरी सोडण्यात आले. तसेच अन्य २६ रुग्णांचा पहिला तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असून एक-दोन दिवसात दुसरा अहवाल नकारात्मक आल्यावर त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. रविवारी १० आणि सोमवारी ४४० अशा शहरातील ४५० रूग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ एक अहवाल सकारात्मक असून तोही दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविलेल्या आधीच्या बाधित रुग्णाचा आहे. अशा रितीने एका बाजूला दोन दिवसांत एकही नवा रुग्ण शहरात आढळून आला नसतांना आणि दुसरीकडे ४४९ अहवाल नकारात्मक आल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु मंगळवारी ४८ अहवाल सकारात्मक आल्याची माहिती आली आणि मालेगावकरांच्या चिंतेत पुन्हा भर पडली. यात चार रुग्ण आधीचे बाधित असून ४४ नव्या रुग्णांचा समावेश आहे.
या ४४ जणांमध्ये १३ जण शहराच्या पश्चिम भागातील असून ३१ जण हे पूर्व भागातील आहेत. चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेचा एक आरोग्य अधिकारी करोना बाधित असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या अधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका महिला कर्मचाऱ्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो सकारात्मक असल्याचे उघड झाले आहे. तसेच सटाणा नाका भागात वास्तव्यास असलेली खासगी महिला डॉक्टर आणि वैद्यकीय सेवक देखील बाधित असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कुसुंबा रोड भागात या डॉक्टर महिलेचा दवाखाना असल्याचे सांगण्यात आले.
विद्यामंदिर संस्थेचे वर्ग विलगीकरणासाठी उपलब्ध
संशयितांच्या विलगीकरणासाठी प्रशासनाला सोयीचे व्हावे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मालेगाव येथील शाळा,महाविद्यालयांचे वर्ग उपलब्ध करून देण्याची तयारी संस्थेचे समन्वयक अद्वय हिरे यांनी दर्शविली आहे. यासंदर्भात हिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. विलगीकरण व्यवस्थेसाठी प्रशासनाला जागेची अडचण भासू नये, या जाणीवेतून या वर्ग खोल्या उपलब्ध करून देत असल्याचे हिरे यांनी पत्रात म्हटले आहे. प्रशासनाने दिलेले आदेश पाळावेत आणि लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, अद्वय हिरे अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ
शहरातील करोना बाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि नवनवीन भागांमध्ये या विषाणूचा होणारा शिरकाव यामुळे उपाययोजना करतांना प्रशासनाची दमछाक होत आहे. करोनाचा उद्रेक आढळून येणारे भाग पालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. या क्षेत्रातील रहिवाश्यांना संचार करण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असून त्यासाठी पोलीस प्रशासनाने जागोजागी अडथळे निर्माण केले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांना जागोजागी जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरात २९ प्रतिबंधित क्षेत्र होते. नवीन रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी चार क्षेत्रांची वाढ केल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ३३ झाली आहे.
