सांगली : वय मोजण्यासाठी बरे म्हणून गुरूजींच्या सोयीने शाळा प्रवेशावेळी एक जूनची जन्मतारीख नोंदली गेलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४५० कर्मचारी शासकीय सेवेतून बुधवारी निवृत्त झाले. नियतवयोमानानुसार निवृत्त झालेल्या या कर्मचार्‍यांना निरोप देण्यासाठी खास समारंभाचे आयोजनही विविध विभागात करण्यात आले होते.

मुलांना शाळेत प्रवेश देत असताना पालकांना निश्‍चित जन्मतारीख आठवत नसेल तर अथवा वय मोजण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी गुरूजींनी अनेक मुलांची जन्मतारीख एक जून ही निश्‍चित केली होती. १९९५ पर्यंत याच पध्दतीने जन्मतारखांची नोंद शाळेत करण्यात येत होती. त्यानंतर मात्र, शाळेत प्रवेश घेत असताना महापालिका, ग्रामपंचायत यांचा जन्मदाखला आवश्यक करण्यात आल्याने मुलाची खरी जन्मतारीख शाळा प्रवेशावेळी नोंदली जात आहे. मात्र, तत्पुर्वी शाळेत प्रवेश केलेल्यांची जन्मतारीख गुरूजींच्या सोयीनुसार नोंदली गेली आहे.

शासकीय नोकरीत हजर होत असताना शाळेच्या दाखल्यावर जी तारीख नोंदली गेली आहे तीच ग्राह्य धरण्यात येत असल्याने अनेक कर्मचार्‍यांचा निवृत्तीचा दिवस 31 मे हा निश्‍चित झाला. यानुसार आज जिल्ह्यातील शिक्षण, जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या आणि नियत वयोमान पूर्ण केलेल्या ४५० कर्मचार्‍यांचा आज सेवेतून निवृत्ती झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील विविध कार्यालयातील आज निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या अशी जिल्हाधिकारी कार्यालय- १३ महापालिका ३२, आरोग्य विभाग १२, जिल्हा परिषद ३०, शिक्षक ११०, पोलीस २१, बाजार समिती ६, परिवहन महामंडळ ९० आणि इतर विभाग १३६ अशी सुमारे ४५० कर्मचार्‍यांनी आज सेवेतून निवृत्ती घेतली.