स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. तेव्हा त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची आज घोषणा करण्यात आली.

तसंच, प्रतापगडच्या संवधर्नाकरता प्रतापगड प्राधिकारण करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले असतील, अशीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

तसंच, लंडनच्या संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी पुढे स्पष्ट केले. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला संधी मिळाली हा सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा सोनेरी दिवस आहे. आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. साक्षीदार होण्याचा मान मिळाला. मी मुख्यमंत्री म्हणून खरं महणजे भाग्यवान समजतो की, आजच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आलं. महाराजांच्या सुराज्याची संकल्पना राबवण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आपल्या पाठीशी आहेत. स्वातंत्र्य केवळ भूमीचं नसतं, ते माणसाचं असतं. याच स्वातंत्र्याचा जयजयकार करण्याची संधी मिळाली आहे, आपण सर्वच जण आज भाग्यवान आहोत. छत्रपतींच्या कल्पनेतील सुराज्य आणायचं आहे. शिवाजी महाराज हे पराक्रमी आणि नवराष्ट्र उभारणारे होते. परंतु, ते गौरवले जातात ते त्यांच्या राज्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे. म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकही संधी दवडता कामा नये. आजच्या सोहळ्याला संबंध जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“आजचा सोहळा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पूजा आहे. आमच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, न्याय देणारं आहे, रयतेच्या हक्काचं रक्षण करणारं आहे अशा प्रकारची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने केली”, असं शिंदे म्हणाले.

प्रतापगड प्राधिकरण

“शिवछत्रपतींसाठी गड-कोट-किल्ले जीव की प्राण होते. म्हणून आम्ही त्यांच्या गड-कोट-किल्ल्यांचं जतन करण्यास प्राधान्य देतोय. एक दूर्गप्राधिकरण सरकार करतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि उदयनराजे यांची मागणी आहे की प्रतापगड प्राधिकरण करावं, आज ते मी जाहीर करतोय. प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पाहावं असंही सांगू इच्छितो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

भवानी तलवार आणणार

लंडनच्या संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. मोदी साहेब आपल्याला मदत करतील आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार आहे”, असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं.

शिवसृष्टीसाठी ५० लाखांचा निधी

“आमदार भरत गोगावले यांनी मागणी केली की शिवसृष्टीसाठी ४५ एकर जागा आहे. शिवसृष्टीसाठी उपमुख्यमंत्री-अर्थमंत्री यांनी शिफारस केली. भरतशेठ तुमची मागणी मान्य. आपण पहिले ५० कोटी रुपेय या शिवसृष्टीला देण्याचा निर्णय करतोय. पैसे कमी पडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, आशिर्वादाने, प्रेरणेने आपण राज्याचा कारभार हाकतोय. म्हणूनच शिवछत्रपतींच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारण्याचा प्रयत्न करूया”, अशीही घोषणा शिंदेंनी आज केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 crores will be given for the shiva srishti at raigad a big announcement from the chief minister on the coronation day of shiva an important decision for the conservation of pratapgad sgk
First published on: 02-06-2023 at 11:26 IST