रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५० गावे जिल्हा प्रशासनाकडून पूरप्रवण गावे तर चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड आणि रत्नागिरी हे तालुके पूरप्रवण तालुके म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या पूरप्रवण गावे व तालुक्याचे आपत्ती व्यावस्थापन आराखडे तयार करुन सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यात येणाऱ्या विविध आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी केली असून सर्व तालुक्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे देखील तयार आहेत. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागात पाणी भरणे, दरड कोसळणे, पूर येणे आदी घटना घडत असतात. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ५० गावे पूरप्रवण गावे म्हणुन ओळखण्यात येतात.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व विभागांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या असून २४ तास अर्लट राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष २५ मे पासून २४ तास कार्यरत रहाणार आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षही सदैव कार्यरत असणार आहे. सर्व तालुके, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये शोध व साहित्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण झाले आहे. चिपळूण याठिकाणी एनडीआरएफ पथकाची मागणी करण्यात आली असून आपत्कालीन मदतीसाठी ३०० आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि वखार महामंडळ तसेच सर्व मोबाईल टॉवरवर वीज अटकाव यंत्रणा कार्यरत आहे. वीज कोसळण्यापासून बचावासाठी ‘दामिनी’ अॅप इन्स्टॉल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वीज पडण्यापुर्वी दहा मिनिटे आधी दामिनी या अॅपवर त्याची सुचना कळते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाता येते.