Sangli Ganesh Visarjan 2025 सांगली : प्रदूषणाबाबत सातत्याने केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे यंदा ५३ टक्के श्रींच्या मूर्ती नदीत विसर्जित न करता विसर्जन कुंडात व मूर्तिदान करून सांगलीकरांनी कृष्णेचे प्रदूषण रोखण्यास हातभार लावला. पाचव्या दिवशी सांगली, मिरज व कुपवाड शहरात ६ हजार २४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यांपैकी ३ हजार २२९ मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात, तर उर्वरित मूर्ती दान करण्याबरोबरच विसर्जन कुंड आणि मिरजेतील गणेश तलावात विसर्जित करण्यात आल्या.

महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्तिदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे. महापालिकेच्या पर्यावरण, आरोग्य विभागामार्फत मूर्तिदान मोहिमेचे निरीक्षण नियमितपणे केले जात आहे. तसेच मूर्तींचे दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारीदेखील पार पाडली जात आहे.

आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख व राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहायक आयुक्त सहदेव कावडे, नागेश मद्राशी, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

नदीत मूर्ती विसर्जित न करता विसर्जन कुंडात व मूर्तिदान करून सांगलीकरांनी कृष्णेचे प्रदूषण रोखण्यास हातभार लावला. महापालिकेच्या मूर्तिदान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील पाचव्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या चारपैकी प्रभाग एकमध्ये नदीत ३२००, तर मिरजेत २९ मूर्तींचे कृष्णा पात्रात विसर्जन करण्यात आले. तर, कुंडात १५२४ गणेशमूर्तींचे भक्तांनी विधिपूर्वक विसर्जन केले. महापालिकेकडे २२९ श्रींच्या मूर्ती दान स्वरूपात जमा करण्यात आल्या. कुपवाड परिसरात ३३२ विहिरींमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले, तर मिरजेतील गणेश तलावात ७०० श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निर्माल्य संकलनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले असून, रविवारी विसर्जनासाठी आणलेले ९ टन निर्माल्य या वेळी संकलित झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने सोमवारी देण्यात आली.