हिंगोली : जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गेल्या १० महिन्यांत तब्बल ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ३३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे वारस मदतीस पात्र ठरले असून, त्यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. ६ प्रकरणे अपात्र ठरली असून, ८ प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. काही अलीकडील आत्महत्यांच्या नोंदी अद्याप तालुकास्तरावरून प्राप्त न झाल्याने ती प्रक्रिया प्रलंबित आहे.

अतिवृष्टी, नापिकी आणि बाजारातील भावघट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाल्याने आणि भाव न मिळाल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. परिणामी अनेक शेतकरी कर्जफेडीच्या विवंचनेत आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णाजी सांगळे (वय ४५) यांनी २७ ऑक्टोबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडियाचे १ लाख ४२ हजार रुपयांचे पीककर्ज होते. सततच्या नापिकीमुळे आणि वाढत्या आर्थिक ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

तसेच वसमत तालुक्यातील अकोली येथील माणिक दत्तराव कदम (३५) यांनी २९ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे सव्वा एकर शेती होती आणि त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातात आले नाही, रोजमजुरीही बंद पडली आणि कर्जफेडीची चिंता वाढल्याने त्यांनी आपले जीवन संपवले.

जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत ४७ प्रकरणांपैकी ३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मंजूर करण्यात आली. शासन दरबारी आतापर्यंत ५२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या असून, ३ शेतकऱ्यांची नोंद बाकी आहे. तर एकूण १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे.