Health Scam In Maharashtra Allegations By Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (आमदार) रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्यातील कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये, त्यांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतरही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या घोटाळ्यातील कंपनीने प्रकरण दाबण्यासाठी कोणाला किती खोके दिले, याची माहिती कागदपत्रांसह समोर आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये असा आरोप केला आहे की, “महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या ६००० कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.”
रोहित पवार पुढे म्हणाले की, “झारखंडमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम या कंपनीकडे होते. महाराष्ट्रातदेखील ३३ लाखांची अॅम्ब्युलन्स ८६ लाखांना विकत घेऊन ६००० कोटींपेक्षा अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे.”
“या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवला, शासनाने मात्र दुर्लक्ष केले. सुमित फॅसिलिटीजने हे प्रकरण कशाप्रकारे दाबले, कोणकोणाला किती खोके, कसे दिले याचा हिशोब कागदपत्रांसह महाराष्ट्रासमोर आम्ही मांडू. तूर्तास सरकारने अॅम्ब्युलन्स निविदा प्रक्रिया स्थगित करावी, हेच शासनासाठी योग्य राहील!” असे रोहित पवार शेवटी म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे सरकारवर टीका करत आहेत. गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यानंतरही त्यांनी सरकार व मंत्र्यांवर काही आरोप केले होते. तसेच अधिवेशन संपल्यानंतर रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात कथितपणे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतूनही टीका झाली होती. याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही आता जोर धरत आहे.