गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिशय शांत व नक्षलवाद्यांचे अस्तित्व नेसलेला तालुका, अशी ओळख असलेल्या चामोर्शीत नक्षलवादी सक्रीय झाले असून तब्बल २० वर्षांनंतर भुसुरूंग स्फोट करून मोठी हिंसक कारवाई घडवून आणली आहे. घनदाट जंगलाचा भाग सोडून नक्षलवाद्यांनी ही पहिलीच मोठी हिंसक कारवाई करतांना संपूर्ण तालुक्याला रक्तरंजित केले आहे.
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर चामोर्शी हा या जिल्ह्य़ातील सर्वात शांत तालुका आहे. आदिवासी, मराठी नोकरदार व व्यापारी वर्गासोबतच बंगाली भाषिक लोकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात कधी काळी नक्षलवादी सक्रीय होते. शासकीय वाहनांची जाळपोळ, आदिवासी गावकऱ्यांना मारहाण, अशा छोटय़ा-मोठय़ा घटना वगळता या तालुक्यात नक्षलवाद्यांचे फारसे अस्तित्व नव्हतेच. गडचिरोलीत १९८० च्या दशकात नक्षलवादी चळवळीचा प्रवेश झाला तेव्हा ही चळवळ सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली या तालुक्यात अधिक सक्रीय होती.
नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून या तालुक्याकडे बघितले जाते. जंगलात वास्तव्यास असलेल्या नक्षलवाद्यांसाठी चामोर्शीच्या बाजारातून मोठय़ा प्रमाणात साहित्याची खरेदी केली जाते. त्या पलिकडे चामोर्शीत नक्षलवाद्यांचे अस्तित्व नाही. मात्र, गेल्या काही दिवसात या तालुक्यात नक्षलवादी पुन्हा सक्रीय होण्याच्या दृष्टीने पावले टाकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले असता चामोर्शी तालुक्यातील जंगलाने व्याप्त परिसरात नक्षलवाद्यांचे अस्तित्व वाढत असल्याची गंभीर बाब पोलिस दलाच्या निदर्शनास आली. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनीही या तालुक्यातील नक्षलवाद्यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष देणे सुरू केले. अशातच येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे प्रत्यक्ष येणे-जाणे असल्याची माहिती मिळाली. काही ठिकाणी तर नक्षलवाद्यांची शिबिरेही झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या तालुक्यात चामोर्शी-मुलचेरा मार्गावर नक्षल शोधमोहिम राबविण्यात येत होती. जसे पोलिसांचे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष होते, तसेच नक्षलवाद्यांचेही पोलिसांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष होते.
ज्या तालुक्यात नक्षलवादी सक्रीय नाहीत त्याच तालुक्यात मोठी हिंसक घटना घडल्याने पोलिस दलाला जबर धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील सर्व प्रमुख रस्त्यांखाली भुसुरूंग पेरून ठेवले आहेत. त्यामुळे पोलिस गाडय़ांचा कमीतकमी वापर करतात. पोलिसांकडून वाहनांच्या वापरात वाढ होताच नेमकी संधी मिळताच ते स्फोट घडवून आणतात. यावेळीही नक्षलवाद्यांनी तेच केले असल्याचे या स्फोटातून दिसून येते. गेल्या वीस वर्षांत जर या तालुक्यातून नक्षलवाद हद्दपार झाला होता, तर नक्षलवादी पुन्हा सक्रीय कसे झाले, हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
नक्षलवादी हल्ल्याचे कारण काय?
नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष प्रा.जी.एल.साईबाबा याला तीन दिवसापूर्वी अटक होताच नक्षलवाद्यांनी सापळा रचून हा मोठा भुसुरूंग स्फोट घडवून आणल्याची चर्चा आहे. नक्षलवाद्यांनी हा सापळा आधीच रचून ठेवला होता व साईबाबाच्या अटकेनंतर त्याची अंमलबजावणी केली, हा योगायोग आहे की नाही, यावरही चर्चा सुरू आहे, परंतु साईबाबाच्या अटकेचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे.