नांदेड : परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात असताना अतिवृष्टीची किमया यंदाच्या पावसाळ्यात साधली गेली आहे. २९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नऊ मंडळात ७० ते १०३ मिलीमीटर पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. आतापर्यंत १३७.३० टक्के पाऊस झाला असून, दीडशे टक्क्यांकडे झपाट्याने वाटचाल सुरू असल्याचे दिसते.

ऑक्टोबर महिना शुक्रवारी संपतो आहे. तरीही भर पावसाळ्यासारखा पाऊस दररोज पडत असून, त्याचे प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे. गुरुवारी (दि. ३०) सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.२० मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ९५.६० मिमी पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाला. त्या खालोखाल भोकर तालुक्यात ७६.८० मिमी पावसाची नोंद झाली. हदगाव तालुक्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला.

गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस पुढील प्रमाणे (मिमीमध्ये) : नांदेड २.१०, बिलोली ४.४०, मुखेड २.१०, कंधार १८.५०, लोहा २४.९०, हदगाव ६८.९०, भोकर ७५.८०, देगलूर ४.९०, किनवट २०.९०, मुदखेड २३.१०, हिमायतनगर ९५.६०, माहूर २४.३०, धर्माबाद २३.५०, उमरी १३.७०, अर्धापूर १८.७० आणि नायगाव तालुक्यात ३.१० मिमी पावसाची नोंद झाली.

या मंडळांत अतिवृष्टी

तळणी ७१ मिमी, तामसा ९४, आष्टी ७३.२५ (ता. हदगाव), भोकर ९७.५०, मोघाळी ७२, मातूळ ७८.५० (ता. भोकर) आणि हिमायतनगर मंडळात ९१.५०, जवळगावात १०३.७५ तर सरसम मंडळात ९१.५० मिमी पावसाची नोंद झाली.