सातारा- सातारा जिल्हा रुग्णालय येथे नव्याने होत असलेल्या कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युतपुरवठा या कामासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ७१ लाख ५८ हजार ५३५ रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुसज्ज कॅथलॅब लवकरच सुरू होऊन साताऱ्यातच रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. शिवेंद्रसिंहराजे हृदय रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरले असून रुग्णांसह नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा जिल्हा रुग्णालय येथे हृदय रुग्णांसाठी आवश्यक असणारी कॅथलॅब सुविधा मंजूर झाली होती. जिल्हा रुग्णालय येथे कॅथलॅब स्थापन करणेकरिता बांधकाम सुरू आहे. याचा वेळोवेळी आढावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सातत्याने घेतला जात आहे. या कॅथलॅब निर्मितीमुळे सातारा जिल्ह्यातील गरीब व गरजू हृदय रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हृदय रुग्णांना उपचाराकरिता पुणे, मुंबई अथवा अन्य ठिकाणी जावे लागणार नाही.

सुसज्ज कॅथलॅबमध्ये हृदय रुग्णांकरिता बाह्य रुग्ण सेवा, तसेच ईसीजी, टु-डी ईको व हृदय रुग्णांकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या तसेच ॲन्जीओग्राफी,ॲन्जीओप्लास्टी व बायपास सर्जरी आदी सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. तसेच हृदय रुग्णांकरिता आवश्यक असणारा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा १० खाटांचा अतिदक्षता विभागही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातच आता अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना नवा आयाम मिळेल व गोरगरीब गरजू रुग्णांना दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युतपुरवठा या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातील नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.