लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : जमावबंदीचा आदेश झुगारून मोहोळ येथे सोलापूर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मोहोळ येथील वादग्रस्त माजी आमदार रमेश कदम व शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७४ जणांना सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश आय. ए. शेख यांनी एक महिन्याच्या कारावासासह प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

४ जुलै २०१५ रोजी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून नंतर मोहोळ पोलीस ठाण्यातही व मोहोळ पोलीस ठाणे येथे तत्कालीन राष्ट्रवादीचे वादग्रस्त आमदार रमेश कदम व शरद कोळी यांच्यासह इतरांनी अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलन केले. पोलिसांवर हल्लाही केला होता. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या जाळीचे नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या फिर्यादुनुसार सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

आणखी वाचा-सोलापूर : लग्नाळू तरूणांना लुबाडणारी टोळी सापळ्यात अडकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खटल्याच्या न्यायालयी सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादीसह पोलीस तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांचे अंगरक्षक असलेले पोलीस शिपाई यांची साक्ष तसेच आंदोलनाच्यावेळी काढण्यात आलेले व्हिडीओ व छायाचित्रिकरण महत्वाचे ठरले. सरकार पक्षाचे चार महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील कविता बागल तर आरोपींच्यावतीने ॲड. मिलींद थोबडे, ॲड. राज पाटील व ॲड सराटे यांनी काम पाहिले.