अहिल्यानगर : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा १६ जूनपासून पुन्हा सुरू होत आहेत. सरकारी व खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आत्तापर्यंत ७८.२० टक्के पुस्तके जिल्ह्यात पोहोच झाली आहेत. एकूण २३ लाख ४१ हजार २९९ पाठ्यपुस्तकांची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे केली होती. त्यातील आत्तापर्यंत १८ लाख ३१ हजार ८ पुस्तके प्राप्त झाली आहेत. मोफत पाठ्यपुस्तके बालभारतीच्या पुण्यातील डेपोतून जिल्ह्यातील १४ तालुक्यात पोहोच करण्यात आली आहेत.
तालुकास्तरावर त्याचे विषयनिहाय वर्गीकरण करून त्यानंतर ते शाळास्तरावर पोहोच केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी दिली. पंधरा दिवस आधीच ७८ टक्के पुस्तके जिल्ह्यात पोहोच झाल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण २३ लाख ४१ हजार २९९ पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविण्यात आली. त्याची किंमत १४ कोटी ३० लाख ३३ हजार ७६३ रुपये आहे, आतापर्यंत १८ लाख ३१ हजार ८ पुस्तके मिळाली. त्याची किंमत ११ कोटी ८९ लाख ३३ हजार ३९२ रुपये आहे. अद्याप ५१ हजार २९१ पुस्तके मिळणे बाकी आहेत.
संगमनेर तालुक्यात जवळपास सर्व म्हणजे ९९.९० टक्के पुस्तके पोहोच झाली आहेत तर पाथर्डी, राहुरी, जामखेड व राहता तालुक्यात ९२ टक्क्यांपेक्षा अधिक तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले व श्रीगोंदा तालुक्यात ६० टक्क्यांपर्यंत तर शेवगाव तालुक्यात ६७ टक्के पुस्तके पोहोच झाली आहेत.
पहिलीची पुस्तके अद्याप नाहीत. मोफत पाठ्यपुस्तके पोहोच झाली आहे ती पहिलीची वगळून. यंदा पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न लागू केला जात आहे. त्यामुळे अद्याप या अभ्यासक्रमाची पुस्तके पोहोच झालेली नसल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले.
शिक्षकांवर जबाबदारी
शाळा जरी १६ जूनला सुरू होत असल्या तरी शिक्षकांनी दोन दिवस आधीच शाळेवर हजर राहून स्वच्छता, जागरूकतेसाठी प्रचार फेरी, पालक सभा, पहिल्याच दिवशी १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहण्यासाठी नियोजन करायचे आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन पाहणी करणार असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी दिली.
गणवेशही पहिल्याच दिवशी मिळणार
गेल्या वर्षी मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळण्यात दिरंगाई झाली होती. थेट गणवेश कापडाचा पुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेश पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. समित्यांना प्रति दोन गणवेशासाठी ६०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करण्याची सूचना मार्च महिन्यातच समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी संख्या, मापे घेणे याचे नियोजन सुरू असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.