राहाता: पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ममदापूर येथून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २१ गोवंशीय जनावरांची सुटका करून २ आरोपींना ताब्यात घेतले. दोन मोटारींसह त्यांच्याकडून ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ममदापूर येथे शोएब कुरेशी व त्याच्या साथीदारांनी गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी एका घरात डांबून ठेवून त्यांची स्विफ्ट व इंडिगो मोटारीतून वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी छापा टाकला. साजीद युनूस कुरेशी (वय २६, रा. ममदापूर, राहाता) व रेहान अहमद अयाज कुरेशी (वय २४, रा. ममदापूर) या दोघांना ताब्यात घेतले. शोएब यासिन कुरेशी (रा. ममदापूर) हा फरार झाला.
पोलिसांच्या चौकशीत ही जनावरे शोएब यासिन कुरेशी, शाहीद उस्मान कुरेशी, मुद्दसर गुलाम कुरेशी (तिघे फरार) यांची असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व आरोपींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने ममदापूर येथे गेल्या महिनाभरात पथकाने चार-पाच वेळा कारवाई करून गोवंशाची सुटका केली.
मात्र, लोणी पोलिसांकडून कारवाई होत नाही. लोणी पोलिसांच्या हद्दीत, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गावातही गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होते. त्यामुळे लोणी पोलीस ठाण्यात कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी बाभळेश्वर येथील लोकसंग्राम परिषदेचे अध्यक्ष गोरक्ष गवारे यांनी केली.