नगर अर्बन मल्टिस्टेट सहकारी बँकेला यंदा ९ कोटी १ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे संचालक मंडळाने सभासदांना २० टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे, तशी परवानगी रिझव्र्ह बँकेकडे मागण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संचालक मंडळाच्या सभेनंतर गांधी यांनी वार्षिक ताळेबंद जाहीर केला. उपाध्यक्ष राधावल्लभ कासट तसेच संचालक व व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते. बँकेने ग्रॉस एनपीए ५.२५ टक्के तर नेट एनपीए शून्य टक्के राखला आहे. रिझव्र्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केल्याने बँक लवकरच गुजरातमधील सुरत व अहमदाबाद येथे शाखा सुरू करेल. यंदा आणखी किमान १५ नव्या शाखा सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा गांधी यांनी व्यक्त केली.
गांधी म्हणाले, गेल्या वर्षी निव्वळ नफा ८ कोटी १० लाख रु. झाला होता. गेल्या वर्षी १८ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला होता, त्यातील १५ टक्के वितरित करण्यात आला आहे. उर्वरित ३ टक्के रिझव्र्ह बँकेच्या परवानगीनंतर वितरित केला जाणार आहे. गेल्या सहा वर्षांत एनपीएची ४ हजार २८८ खाती होती. ती कमी केल्यामुळे आता केवळ २० खातेदारांकडे ३२ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम येणे आहे. नगर व गणेश साखर कारखान्याकडे अद्यापि प्रत्येकी २ कोटी रु. येणे बाकी आहे. बँक लवकरच २० ठिकाणी एटीएम सुरू करणार आहे. सध्या बँकेकडे ९३८ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वार्षिक उलाढाल १ हजार ५२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भागभांडवल १ हजार ९८७ कोटी झाले आहे. ५८५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
‘कोपरगाव’ची चौकशी सुरू
अर्बन बँकेच्या कोपरगाव शाखेत कर्जतारणाविषयी तक्रार आली आहे. त्याबद्दल चौकशी सुरू आहे, अशी माहिती देऊन गांधी यांनी सांगितले, की राहुरी पीपल्स बँकेचे विलीनीकरण करण्याबाबत दोन्ही बाजूंकडून सामंजस्य करार करण्यात आला आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व सातभाई बँकेच्या विलीनीकरणावर विचार सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
अर्बन बँकेला ९ कोटींचा नफा
नगर अर्बन मल्टिस्टेट सहकारी बँकेला यंदा ९ कोटी १ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे संचालक मंडळाने सभासदांना २० टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे, तशी परवानगी रिझव्र्ह बँकेकडे मागण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
First published on: 11-04-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 crore profit to urban bank