निजामुद्दीन दिल्ली (मरकज) येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या कझाकिस्तान व किरगिझस्तान या दोन देशातील 9 नागरिकांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या 9 जणांना आज न्यायालयात हजर केले असता तुरुंगात रवानगी करण्यात आली.

करोना विषणू संसर्ग सुरू असतांनाच निजामुद्दीन दिल्ली येथून गडचिरोलीत दाखल झालेले 9 विदेशी नागरिक हे पर्यटन व्हिसा घेवून येथे वास्तव्यास होते. या 9 जणांनी 8 मार्च रोजी दिल्ली येथे मरकज कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर ते गडचिरोलीत आले होते. त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून संस्थात्मक विलगिकरणात ठेवले होते. आज त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची  तुरुंगात रवानगी करण्यात आली.

विशेष म्हणजे 11 विदेशी व २ भारतीय परराज्यातील नागरिक चंद्रपूर येथील छोटी मशिदमध्ये आले होते. चंद्रपूर येथे आल्यानंतर नमूद विदेशी नागरिकांनी जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करून त्यांनी व्हिसाचे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरूध्द चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. या सर्व १३ नागरिकांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयने त्यांचा न्यायालयीन रिमांड मंजूर केला होता.