सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तपासणीत सदोष खाद्य पदार्थ आढळल्याने ९ व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले असून ५१ व्यावसायिकांना दर्जात सुधारणा करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भेसळीच्या संशयावरून ४ लाखाचे खाद्यतेल, बर्फी, भगर पीठ जप्त करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जिल्ह्यात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा इत्यादी अन्नपदार्थ विक्री करणार्या आस्थापनांवर विशेष धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात या पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्व आस्थापनांची सखोल तपासणी केली जात असून, वापरले जाणारे तेल, तूप, दूध व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

अन्न विक्री करणार्या एकूण १७४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दूध ३८, खवा मावा १४, तूप २८, खाद्यतेल ३६, मिठाई ५८, ड्रायफ्रुटस १८, चॉकलेट २०, भगर १४ व इतर अन्नपदार्थ (रवा, बेसन, आटा इत्यादी) चे ४३ नमुने असे एकूण २६९ अन्न नमुने घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

तपासणीच्या अनुषंगाने ५१ अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून ९ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, ४ अन्न आस्थापनांच्या तपासण्या करुन ९८४ लिटरचा व ३ लाख ८३ हजार ५८१ रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच एका अन्न आस्थापनेमधून ४६ किलो वजनाचा १४ हजार ३७५ रुपये किंमतीचा बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

तसेच एका अन्न आस्थापनेमधून ४७.३ किलो वजनाचा ४ हजार ५५७ रुपये किंमतीचा भगर व भगरपीठाचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे सहायक आयुक्त रा. अ. साळुंखे यांनी सांगितले. ग्राहकांनीही मिठाई व इतर दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर खावून संपवावेत किंवा रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमानास साठवावेत, असे आवाहन त्यांनी केले.