Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांविरोधातच खेळी केली आहे. आज पत्रकार परिषेदत घेऊन त्यांनी ही माहिती दिली.

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रेदशाध्यक्ष होते. तर, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवारांसह गेलेल्या प्रफुल्ल पटेलांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >> अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांना राष्ट्रवादीचा दणका, शिस्तभंगाची कारवाई

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

“संघटनात्मक नियुक्ती माझ्या माध्यमातून जाहीर केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात जयंत पाटील यांची आम्ही नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतर एक तत्काळ व्यवस्था असावी त्या हिशोबाने महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्षपद दिले होते. त्यांच्या जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो. आणि त्यांच्या जागेवर सुनिल तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करतोय”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

अजित पवारांनी २ जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीत असणारे विरोधी बाकावर बसलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादीतील काही आमदारांना आपल्या सोबत घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय नाट्य घडत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. परंतु, याला पलटवार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी त्यांचं प्रदेशाध्यक्ष पदच रद्द केलं आहे.

हेही वाचा >> “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही आमच्याकडेच; कुणीही कारवाई…” अजित पवारांची रोखठोक भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार काय म्हणाले?

काहींनी आमच्या विरोधात सांगून नोटीस वगैरे काढली आहे तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही. असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारचा फायदा अर्थात निधी, परवानग्या लागतात. केंद्र सरकार वेगळ्या विचारांचं आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असलं तर निधीच्या बाबतीत कमतरता राहते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.