छत्रपती संभाजीनगर : भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीशी संबंधित सुनावणीत पाच संचिकांवर तक्रारदाराच्या बाजूने आदेश देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अपर तहसीलदार व दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर तहसीलदार नितीन गर्जे (वय ४५), खासगी व्यक्ती नितीन धुमा चव्हाण (वय ३८) व सोहेल जुबेर बहाशवान (वय २९), असे लाच प्रकरणातील तिघांची नावे असून या प्रकरणी ५० वर्षीय तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती, अशी माहिती सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांनी दिली.

या संदर्भातील तक्रारीनुसार तक्रारदार मुलाचे नावे आणि त्यांचे नातेवाईकांच्या नावे असलेल्या मिटमिटा येथील प्लॉटचे क्षेत्रदुरुस्तीच्या आदेशाकरीता डिसेंबर २०२४ पासून पाच संचिका अपर तहसिलदार कार्यालयाकडे सुनावणी कामी प्रलंबित होती. तक्रारदार सुनावणी करीता एप्रिल २०२५ मध्ये हजर झाले असता सुनावणीचा निकाल त्यांच्या बाजुने लावणेसाठी अपर तहसीलदार नितीन गर्जे यांचे कामकाज पाहाणाऱ्या खासगी व्यक्तीकडुन तक्रारदार यांना लाचेची मागणी झाली होती. तक्रारदार यांना लाच देण्यांची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मे रोजी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

तक्रारीची पडताळणी १४ मे रोजी करण्यात आली. यामध्ये शासकिय पंचासह अपर तहसीलदार नितीन गर्जे व त्यांचे कामकाज पाहाणारा खासगी व्यक्ती नितीन चव्हाण यांची भेट घेवून कामाबाबत तक्रारदाराने केली. या भेटीत अपर तहसीलदार नितीन गर्जे यांनी खासगी व्यक्ती नितीन चव्हाण यांस लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याने उपरोक्त प्रकरणी आदेश त्यांच्या बाजुने लावणेसाठी अपर तहसिलदार नितीन गर्जे यांचे वतीने प्रत्येकी फाईल ६० हजार याप्रमाणे एकूण तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या नंतर १५ मे रोजी अपर तहसीलदार कार्यालयात शासकिय पंच यांचेसह तक्रारदाराकडुन लाच स्वीकृती सापळा कारवाईचे नियोजन केले असता नितीन चव्हाण याने परिसरातील पार्कीगचे काम पाहाणारा सोहेल जुबेर बहाशवान याच्याकडे रक्कम सुपुर्द करणेस सांगितले.

त्यावेळी लाचेची रक्कम तक्रारदार यांनी खासगी सोहेल जुबेर बहाशवान यांचे कडे सुपुर्द करुन इशारा केला असता त्यास जागीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. आरोपीतांची घरझडतीही घेण्यात आली. अंगझडतीमध्ये नितीन चव्हाण याच्याकडे एक आयफोन 14, व नोकीया मोबाईल तसेच रोख रक्कम ७५ हजार रुपये मिळून आले आहेत. तर सोहेल बहाशवान यांचे मोबाईल फोन व ६० हजार मिळून आले आहेत. सापळा अधिकारी वाल्मीक कोरे, सहायक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.