अहिल्यानगरः श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचे ४०८ किलो वजनाचे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. यासंदर्भात एका छोट्या मालमोटार चालकाला अटक करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८ धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे तर विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे १४ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.
यासंदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शिवपूजे यांनी सांगितले की, श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका छोट्या मालमोटारीतून अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पथकाला शोध घेण्यास सांगितले. काल, बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर एमआयडीसी व परिसरातील गावातून छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असता, दिघी- खंडाळा रस्त्यावर हा टेम्पो (एमएच २० बीटी ९५१) दिघीच्या दिशेने येताना दिसला. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १४ गोण्यामध्ये पावडर व उर्वरित ७ गोण्यांमध्ये स्फटिक आढळले. वाहनचालक राशिनकर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता हे स्फटिक अल्प्राझोलम औषध असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनवण्याकरता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले.
अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याची खात्री करण्याकरता अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांची संपर्क साधला व त्यांना घटनास्थळी पाचारण केले. या पथकाने केलेल्या तपासणी प्रथमदर्शनी पावडर व स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ व त्यासाठी लागणारा कच्चामाल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ६ कोटी ९७ लाख ६७ हजार रुपये किमतीचे ६९ किलो ७६७ ग्रॅम वजनाच्या अल्प्राझोलम स्फटिकच्या ७ गोण्या तर ६ कोटी ७६ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ३३८ किलो ३७ ग्रॅम वजनाचे अल्प्राझोलम बनवण्याची पावडर १४ गोण्यांमध्ये आढळली. त्याच्यासह १ लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण १४ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी छोट्या मालमोटारीचा चालक मिनीनाथ राशिनकर याच्याकडे चौकशी केली असता हा माल विश्वनाथ शिपणकर याने दिल्याचे सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ. शिवपुजे यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ म्हणून गणला जातो तो हाताळण्यास व वापरास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा वापर झोपेच्या गोळ्या तयार करण्यासाठी केला जातो. हा माल कुठे उत्पादित करण्यात आला याचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ शिपणकर हा यापूर्वी एका औषध कंपनीत काम करत होता असे समजले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक रोशन निकम, रोहिदास ठोंबरे, दीपक मेढे, अंमलदार किरण मंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातकडे, अजित पठारे, अकबर पठाण, अजिनाथ आंधळे, राहुल पोळ यांच्या पथकाने सहभाग घेतला.